वेल्हे, हवेलीत भात रोपांना जीवदान; अपुर्‍या पावसाने चिंता व्यक्त | पुढारी

वेल्हे, हवेलीत भात रोपांना जीवदान; अपुर्‍या पावसाने चिंता व्यक्त

वेल्हे(पुणे); पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात भात पिकाचे आगार असलेल्या वेल्हे तसेच हवेली तालुक्यात तब्बल महिनाभरानंतर पावसाचे आगमन झाले आहे. त्यामुळे भात, नाचणीच्या रोपांसह इतर खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे. मात्र, अपुर्‍या पावसामुळे शेतकर्‍यांची चिंता कायम आहे. रायगड जिल्ह्यालगतच्या वेल्हे तालुक्यातील केळद, घिसर, टेकपोळे, घोल, गारजाईवाडी, पानशेत परिसरात रविवारच्या तुलनेत सोमवारी (दि. 26) पावसाचा जोर ओसरला. दिवसभरात पानशेत येथे 7 मिलीमीटर पाऊस पडला.

जून महिना संपत आला तरी पावसाने पाठ फिरल्याने पेरणी केलेल्या जवळपास 50 टक्के भात, नाचणी पिकांच्या रोपांची उगवण झाली नाही, तर ठिकठिकाणी रोपांची वाढ खुंटली होती. पश्चिम हवेली, सिंहगड भागातील मोगरवाडी, खामगाव मावळ आदी ठिकाणी भात बियाणांची उगवण झाली नाही. असे असले तरी आता आलेल्या पावसाने उर्वरित पिकांना जीवदान मिळाले आहे. दरम्यान, सिंहगड भागात तुरळक प्रमाणात पाऊस पडत आहे. जमिनीत थोडीफार ओल निर्माण झाली आहे. त्यामुळे भात रोपांच्या वाढीसाठी चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी आहेत.

पावसाचे प्रमाण कमी असले, तरी रिमझिम पावसामुळे तुर्त रोपांना जीवदान मिळाले आहे. पावसाचे प्रमाण पाहून खरीप पिकांच्या पेरण्या कराव्यात.

धनंजय कोंढाळकर,
तालुका कृषी अधिकारी, वेल्हे.

मे महिन्याच्या अखेरीस मान्सूनपूर्व पाऊस पडल्याने तोरणा राजगड भागात शेतकर्‍यांनी धुळवाफेवर भात, नाचणी रोपांच्या पेरण्या केल्या होत्या. उशिरा पाऊस सुरू झाल्याने रोपांच्या वाढीवर परिणाम झाला आहे.

विकास गायखे, शेतकरी, वेल्हे.

हेही वाचा

आसुर्लेतील वारकरी महिलेचा ट्रॅक्टर-ट्रॉलीतून पडल्याने मृत्यू

कोल्हापूर : विकासकामांसाठी निधी देणार नसाल तर ‘डीपीडीसी’ला येऊन उपयोग काय?

पुण्यातील सणस मैदानावर उद्घाटनानंतरही ’नो एन्ट्री’; महिन्यापूर्वीच शुभारंभ

Back to top button