पुण्यात दहा वर्षांत यंदा सर्वांत उशिरा मान्सून ! 30 जूनपर्यंत जोरदार पाऊस | पुढारी

पुण्यात दहा वर्षांत यंदा सर्वांत उशिरा मान्सून ! 30 जूनपर्यंत जोरदार पाऊस

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  गेल्या दहा वर्षांत मान्सून यंदा सर्वांत उशिरा शहरात दाखल झाला आहे. या आधी 2019 मध्ये 24 जूनचा रेकॉर्ड होता. तो मोडत 25 जून हा नवा विक्रम त्याने स्थापित केला आहे. अवघ्या चोवीस तासांत शहरात 24 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. गेल्या पाच दिवसांपासून शहराच्या वेशीवर घुटमळत असलेला मान्सून अखेर रविवारी पुण्यात आल्याची घोषणा पुणे वेधशाळेचे प्रमुख अनुपम कश्यपि यांनी केली. दरम्यान, 30 जूनपर्यंत शहरासह घाटमाथ्याला जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी रेनकोट, छत्री जवळ ठेवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
गेल्या पाच  दिवसांपासून मान्सून शहराच्या वेशीवर अडकला होता. पश्चिमी वार्‍यांचा जोर कमी असल्याने तो शहरासह जिल्ह्यात येत नव्हता. अखेर रविवारी 25 जून रोजी तो मुंबई व पुणे शहरात एकाच वेळी दाखल झाला. यंदा त्याने गेल्या दहा वर्षांतील सर्व विक्रम मोडीत काढले. या आधी 2019 मध्ये 24 जून रोजी तो सर्वांत उशिरा आल्याची नोंद होती.  2016 मध्ये 20 जून रोजी दाखल झाला होता.
जूनमध्ये पावसाची 88 मिलीमीटरची तूट
शहरात गेल्या 24 तासांत 24 मि. मी.
पावसाची नोंद झाली असून, जून महिन्यात
एकूण 34.9 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.
 25 जूनपर्यंतची शहराची सरासरी 123
मिलिमीटरची असून, अजून 88 मि.मी. तूट आहे.
कमाल तापमानात 8 ते 10 अंशांनी घट..
शहराचे कमाल तापमान गेल्या आठ
दिवसांपासून 34 ते 36 अंशांवर होते. त्यात रविवारपासून तब्बल 8 ते 10 अंशांनी घट
 होऊन ते 26 ते 28 अंशांवर खाली आले.
मान्सून यंदा उशिरा आला खरा, पण त्याचा वेग प्रचंड आहे, त्यामुळे त्याने 24 तासांत अवघा महाराष्ट्र आणि 90 टक्के देश काबीज केला. या आधी क्वचितच इतक्या वेगाने मान्सून देशात आला आहे. पुणे शहरात 30 जूनपर्यंत पाऊस होणार असून, घाटमाथ्यावर पावसाचा जास्त जोर राहील, त्यामुळे त्या भागात जाताना काळजी घ्यावी.
                                                                                            – अनुपम कश्यपि, हवामान विभागप्रमुख.
शहरात 30 जूनपर्यंत पाऊस..
शनिवारी शहरात जोरदार पाऊस झाला. रविवारी सकाळपासूनच पावसाने हजेरी लावली. दुपारी 1 वाजता हवामान विभागाने मान्सून पुण्यात आल्याची अधिकृत घोषणा केली. शहराला चहूबाजूंनी काळ्याभोर ढगांनी घेरले असून, 30 जूनपर्यंत मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज दिला आहे.
हे ही वाचा : 

Back to top button