सांगली काँग्रेस रिचार्ज; महाराष्ट्र-कर्नाटकचे कार्यकर्ते जोशात | पुढारी

सांगली काँग्रेस रिचार्ज; महाराष्ट्र-कर्नाटकचे कार्यकर्ते जोशात

सांगली; पुढारी वृत्तसेवा :  मरगळलेल्या आणि हेवेदाव्यात अडकलेली सांगली जिल्ह्यातील काँग्रेस आज खर्‍या अर्थाने रिचार्ज झाली. महाराष्ट्र आणि कर्नाटकातून एकत्र आलेले कार्यकर्ते जोशात होतेच, पण काँग्रेसची विचारधारा जपणारे असंख्य नागरिकही येत्या निवडणुकीत ठाम भूमिका घेण्यावर ठाम झाले. निमित्त होते सांगलीत आयोजित कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नागरी सत्काराचे.

सांगली काँग्रेसच्यावतीने रविवारी सिद्धरामय्या यांचा सत्कार सोहळा प्रचंड गर्दीच्या साक्षीने पार पडला. अवघ्या पाच दिवसात जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांनी या सोहळ्याची तयारी केली. सिद्धरामय्या हे सकाळी 11.35 वाजता कोल्हापूर विमानतळ येथून सांगलीला आले. दुपारी सव्वा बारा वाजता त्यांचे सोहळ्याच्या स्थळी आगमन झाले, पण सकाळी 9 वाजल्यापासूनच या कार्यक्रमासाठी लोकांची गर्दी व्हायला सुरुवात झाली होती. सांगली जिल्ह्यातूनच नाही तर कराड, सातारा, सीमाभागातील गावे आणि कर्नाटक राज्यातूनही कार्यकर्ते या सोहळ्यासाठी आवर्जून आले होते.

पलूस-कडेगाव मतदारसंघातून तर प्रचंड उत्साहात कार्यकर्ते आले होते. ‘माझा गाव.. पलूस कडेगाव..’ असं लिहिलेल्या टोप्या सार्‍या मंडपात दिसत होत्या. आमदार विश्वजित यांनी लोकांची भेट घेतली. जत भागातून आमदार विक्रमसिंह सावंत, सांगली परिसरातून पृथ्वीराज पाटील, विशाल पाटील, जयश्री पाटील आणि इतर नेत्यांचे अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना यावेळी लाकडाची सुंदर बैलगाडी भेट देण्यात आली.

सिद्धरामय्या, उद्योगमंत्री एम. डी. पाटील यांच्यासह पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही ही एकजूट आणि उत्साह काँग्रेसला आगामी निवडणुकीत शंभर टक्के विजय मिळवून देईल, अशी खात्री व्यक्त केली.

घोंगडं आणि घुंगराची काठी

सोहळ्यानिमित्त महाराष्ट्र आणि कर्नाटकमधला धनगर समाजही मोठ्या संख्येने या सोहळ्यासाठी उपस्थित होता. पिवळ्या टोप्या घातलेले असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते. या कार्यकर्त्यांनी घोंगडं आणि घुंगराची काठी देऊन मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा सत्कार केला. सिद्धरामय्या यांनी कन्नडमध्ये भाषणाला सुरुवात केली तेव्हा घोषणा आणि शिट्ट्यांनी मंडप दणाणून गेला. धनगरी ढोल वादनाने कार्यक्रमात जल्लोष आणला.

Back to top button