Mumbai News | उद्धव ठाकरे, संजय राऊतांच्या निकटवर्तीयांवर ईडीचे १६ ठिकाणी छापे | पुढारी

Mumbai News | उद्धव ठाकरे, संजय राऊतांच्या निकटवर्तीयांवर ईडीचे १६ ठिकाणी छापे

मुंबई, पुढारी ऑनलाईन : बृहन्मुंबई महानगरपालिकेतील (BMC) कोविड घोटाळ्याशी संबंधित (BMC Covid scam) प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) बुधवारी मुंबईतील अनेक ठिकाणी छापेमारी केली. उद्धव ठाकरे (Uddhav Thackery) आणि आदित्य ठाकरे यांच्या निकटवर्तीयांच्या ठिकाणी ईडीने ही कारवाई केली आहे. मुंबईत १६ ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. सुरेश चव्हाण यांच्या ठिकाणी ईडीने छापे टाकले आहेत. (Mumbai News)

बीएमसी कोविड घोटाळ्याच्या संदर्भात ईडीने (Enforcement Directorate) मुंबईतील १६ ठिकाणी छापे टाकले आहेत. ज्यात उद्धव ठाकरेंच्या निकटवर्तीयांच्या ठिकाणांचा समावेश आहे, असे वृत्त काही वृत्तवाहिन्यांनी दिले आहे. मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात आयएएस संजीव जयस्वाल, खासदार संजय राऊत यांच्या जवळच्या मित्रासह १४ जणांच्या ठिकाणी ईडीची झडती सुरू आहे.

आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण आणि संजय राऊत यांचे जवळचे मित्र सुजित पाटकर यांच्या घरावरदेखील ईडीने छापेमारी केली आहे.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) १२,०२४ कोटी रुपयांच्या विविध कामांच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने (सीएमओ) सोमवारी रात्री जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की एसआयटी मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या नेतृत्त्वाखाली चौकशी करेल.

मुंबईकरांचा पैसा मुंबईकरांच्या तिजोरीतच राहिला पाहिजे. तो कोणालाही पळवता येणार नाही. कोणताही राजकीय हेतू न ठेवता मुंबई मनपा भ्रष्टाचाराची एसआयटीकडून निप:क्षपणे चौकशी करण्यात येईल. या चौकशीतून दूध का दूध आणि पाणी पाणी का पाणी होईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल म्हटले होते.

हे ही वाचा :

Back to top button