१ जुलैला मुंबई महापालिकेवर मोर्चा नेणार, पैशांच्या उधळपट्टीचा हिशोब मागणार : उद्धव ठाकरे | पुढारी

१ जुलैला मुंबई महापालिकेवर मोर्चा नेणार, पैशांच्या उधळपट्टीचा हिशोब मागणार : उद्धव ठाकरे

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मुंबई महापालिका विसर्जित होऊन एक वर्ष लोटले तरी निवडणुका घेण्याची हिंमत राज्यातील बेकायदेशीर सरकारमध्ये नाही. रस्ते, जी-२० च्या बैठकांच्या निमित्ताने पैशांची उधळपट्टी केली जात आहे. पालिकेच्या मुदत ठेवीतून सुमारे नऊ हजार कोटींचा निधी आतापर्यंत वापरल्याची माहिती आहे. या सर्वांचा जाब विचारण्यासाठी १ जुलै रोजी मुंबई महापालिकेवर विराट मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी दिली.

आज शिवसेना भवनात शिवसेना नेत्यांसह मुंबईतील माजी नगरसेवकांची बैठक घेतली. या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी १ जुलै रोजी मुंबई महापालिका मुख्यालयावर विराट मोर्चा काढणार असल्याचे सांगितले. आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघणार असल्याचेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. मुंबईला कुणी मायबापच राहिलेला नाही. जे काही सुरु आहे ते लुटालूटच आहे. पालिकेच्या ठेवींमधूनच विकासकामे केली जात आहेत. हा सगळा जनतेचा पैसा आहे. या जनतेच्या पैशांच्या लुटीचा हिशोब द्यावाच लागेल, असे ठाकरे म्हणाले. पालिकेच्या मुदत ठेवीतून जवळपास नऊ हजार कोटींचा पैसा वापरला गेला आहे. या पैशांचा हिशोब द्यावाच लागेल. मुंबईची तिजोरी रिकामी करायची आणि दिल्लीच्या समोर भिकेचा कटोरा घेऊन उभे करायचा डाव यामागे असल्याचा आरोपही त्यांनी केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाच्या काळातील पालिकेतील गैरव्यवहारांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. याबाबत विचारले असता ही चौकशी म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. आमच्या काळात कंत्राटांशिवाय एकही काम दिलेले नाही. कॅगच्या अहवालातही काही वेगळे म्हटलेले नाही. लोकांच्या मनात असंतोष धुमसतो आहे. त्याचा वाचा फोडायला लावू नका. तुमच्या काळातील सगळा कच्चाचिट्टा आमची सत्ता आल्यावर बाहेर काढू, कोणी अधिकारी निवृत्त झाले असले तरी त्यांना जाब विचारू, असा इशाराच उद्धव ठाकरे यांनी दिला.

वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर हे औरंगजेबाच्या कबरीपुढे नतमस्तक झाल्याबाबत थेट भाष्य करणे उद्धव ठाकरे यांनी टाळले. मात्र, युती होती तेंव्हा लालकृष्ण आडवाणी हे मोहम्मद अली जीनांच्या कबरीसमोर नतमस्तक झाले होते. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पाकिस्तानात नवाज शरीफ यांच्या वाढदिवसाचा केक खायला गेले होते. आता एका स्वच्छ विचाराने पुढे जायची गरज आहे. निवडणुका आल्या की जय बजरंगबली करायचे, लोकांना इतिहासात अडकवून चालणार नाही. सत्ताधाऱ्यांना दंगली पेटवुन कारभार करायचा आहे, अशी टिकाही उद्धव ठाकरे यांनी केली.

अर्धवटराव म्हणणारे नावडाबाई झाले

 उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांची अर्धवटराव अशी संभावना केली होती. त्यावर, रामदास पाध्येंच्या बोलक्या बाहुल्यात अर्धवटराव हे पात्र होते. त्याच्या जोडीला आवडाबाई असेही एक पात्र होते. फडणवीस हे दिल्लीचे आवडाबाई आहेत का? पण, आता ते आवडाबाई नाही राहिले, नावडाबाई झाले आहेत, अशी टिकाही उद्धव ठाकरे यांनी केली.

Back to top button