वैज्ञानिकांनी बनवले सिंथेटिक मानवी भ्रूण | पुढारी

वैज्ञानिकांनी बनवले सिंथेटिक मानवी भ्रूण

लंडन; वृत्तसंस्था :  अमेरिका आणि ब्रिटनच्या शास्त्रज्ञांना स्टेम सेलचा वापर करून जगातील पहिले सिंथेटिक मानवी भ्रूण तयार करण्यात यश आले आहे. अगदी पहिल्या टप्प्यात होणारा मानवी गर्भाचा विकास आणि नैसर्गिक गर्भपाताची जीवशास्त्रीय कारणे उलगडण्यासाठी या सिंथेटिक भ्रूणाची निर्मिती करण्यात आली आहे.

द गार्डियनने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, या संशोधनाचा फायदा अनेक पटींनी असून त्यातून मानवी गर्भ कसा विकसित होतो व जनुकीय नोंदी कशा असतात याचा अभ्यास करता येणार आहे. या तंत्रज्ञानामुळे सध्या अस्तित्वात असलेल्या आयव्हीएफ तंत्राच्या क्षेत्रात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. केंब्रिज विद्यापीठ आणि कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या संशोधकांच्या संयुक्त टीमने हे संशोधन केले आहे. प्रोफेसर मॅग्देलिना झेर्निका गोएत्झ या टीमचे नेत्तृत्व करीत आहेत. स्टेम सेल संशोधन संस्थेच्या
वार्षिक बैठकीत त्यांनी या क्रांतीकारक शोधाची माहिती दिली.

द गार्डियनने म्हटले आहे की, नजीकच्या भविष्यात उपचारपातळीवर हे सिंथेटिक भ्रूण वापरता येण्याची मुळीच शक्यता नाही. महिलेच्या गर्भात असे सिंथेटिक भ्रूण पेरणे हेच बेकायदा आहे आणि मुळात गर्भ तयार होण्याच्या आधीच्या पातळीवरचा गर्भ असल्याने त्याचा टप्प्याटप्प्याने विकास कसा होतो हे अजून समोर यायचे आहे.

नैसर्गिक गर्भपाताची कारणे कळणार

संशोधकांच्या टीमच्या प्रमुख प्रोफेसर मॅग्देलिना झेर्निका गोएत्झ म्हणाल्या की, हे पूर्ण मानवी भ्रूण नाहीत. स्टेम सेलचा वापर करून तयार केल्याने आम्ही त्यांना भ्रूणाचे प्रतिरूप म्हणतो. ते अगदी मानवी भ्रूणासारखेच आहेत. गर्भ विकसित होताना म्हणजे धडधडणारे हृदय तयार होताना, मेंदू तयार होतानाच्या प्रत्येक टप्प्याचा अभ्यास करता येणार आहे. त्यामुळे अकाली होणार्‍या नैसर्गिक गर्भपाताची कारणे कळणार आहेत. ही कारणे समजताना नेमके कोणत्या टप्प्यावर काय बिघडले ते समोर येणार आहे. द लॅन्सेटमध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनानुसार जगात दरवर्षी दोन कोटी 30 लाख नैसर्गिक गर्भपात होतात. त्यामुळे अशा गर्भपातांच्या कारणांचा शोध घेणे नवीन संशोधनानुसार सोपे होणार आहे.

Back to top button