पिंपरी : शिक्षण मंडळाच्या माजी सभापतीसह चौघांवर विनयभंगाचा गुन्हा | पुढारी

पिंपरी : शिक्षण मंडळाच्या माजी सभापतीसह चौघांवर विनयभंगाचा गुन्हा

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : नोकरीसाठी परप्रांतातून आलेल्या तरुणीच्या विनयभंग प्रकरणी महापालिका शिक्षण मंडळाचे माजी सभापती अर्जून ठाकरे यांच्यासह चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 15 मे ते 4 जून 2023 दरम्यान पिंपरी आणि लष्कर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे. या प्रकरणी पश्चिम बंगाल येथून आलेल्या एका 28 वर्षीय तरुणीने बुधवारी (दि. 14) पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, महेश्वरी रेड्डी, चिरागउद्दीन शेख, महिला आरोपी (तिघेही रा. कोंढवा, पुणे) आणि अर्जून ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी कामाच्या शोधात असताना तिला वेबसाइटवरुन एका महिलेचा नंबर मिळाला. महिलेने तरुणीला बँकेत नोकरीसाठी मुलाखत असल्याचे सांगून पुण्यात येण्यास सांगितले. त्यानंतर बँकेत नोकरीसाठी वेळ लागणार असल्याचे सांगून इतर नोकरीसाठी आरोपी अर्जून ठाकरे यांच्याशी संपर्क करण्यास सांगितले. त्यानंतर ठाकरे याने तिला भागीदार चिरागउद्दीन शेख, महिला आरोपी आणि महेश्वरी रेड्डी यांच्याशी ओळख करून दिली.

दरम्यान, 15 मे रोजी तरुणीला आरोपींनी पुण्यातील कार्यालयात बोलविले. तेथे ठाकरे याने तिचा विनयभंग केला. त्यानंतर मुख्य आरोपी रेड्डी याने वारंवार पुणे आणि पिंपरी येथील कार्यालयात विनयभंग केला. तर, 3 जून रोजी पुण्यातील कार्यालयात बाथरूममध्ये जाऊन रेड्डी याने तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. या प्रकारानंतर पीडित तरुणी जाऊ लागली असता महिला आरोपीने तिला अडविले.

आम्हीदेखील वेगवेगळ्या मुली रेड्डी याला दिल्या आहेत. तू देखील त्यांना खूश कर, असे सांगितले. त्यानंतर चिरागउद्दीन तिथे आला व त्याने पिस्तूलचा धाक दाखवून धमकावले. त्यानंतर 4 जून रोजी रेड्डी याने तरुणीला व्हिडिओ कॉल करून अश्लील चाळे केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. लष्कर पोलिस तपास करीत आहेत.

हेही वाचा

पुणे जिल्ह्यात ‘जलजीवन’साठी खोदाईचा ‘रात्रीस खेळ चाले’ !

२ माजी महापौरांसह १५ माजी नगरसेवक शिंदे गटात जाणार

पिंपरी : पवना जलवाहिनीचा मुद्दा भावनिक; खा. श्रीरंग बारणे यांची भूमिका

Back to top button