पुणे जिल्ह्यात ‘जलजीवन’साठी खोदाईचा ‘रात्रीस खेळ चाले’ ! | पुढारी

पुणे जिल्ह्यात ‘जलजीवन’साठी खोदाईचा ‘रात्रीस खेळ चाले’ !

पुणे : जलजीवन मिशन अभियानाची कामे करताना अनेक नियम धाब्यावर बसविण्याची जणू स्पर्धाच सुरू असल्याचे चित्र ग्रामीण भागात आहे. पाण्याच्या स्रोतापासून गावामध्ये पाइपलाइन टाकण्यासाठी विनापरवाना ठिकठिकाणी रस्त्यांची सर्रास खोदाई सुरू आहे. भविष्यात रस्त्यांच्या रुंदीकरणासह इतर अडचणींचा सामना विनापरवानगी सुरू असलेल्या रस्ताखोदाईमुळे करावा लागणार असल्याची शक्यता आहे. जिल्ह्यामध्ये प्रत्येक कुटुंबाला नळाद्वारे पिण्याचे पाणी देण्यासाठी जलजीवन मिशन योजनेची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत.

या कामांबाबत आता तक्रारी येण्यास सुरुवात झाली असून, गावातील सजग नागरिक तसेच काही लोकप्रतिनिधींनी देखील पुढाकार घेतला आहे. कामे व्यवस्थित न करता ठेकेदार बिले काढण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र, हे बिले काढताना कामांचा दर्जा, काम करताना आखून दिलेली चौकट पाळली जात नसल्याचा नागरिक आरोप करीत आहेत. जिल्ह्यातून जाणारे राष्ट्रीय महामार्ग, इतर जिल्हा मार्ग तसेच ग्रामीण रस्त्यांची रात्रीतून खोदाई होऊन जलजीवन मिशनसाठीची पाइपलाइन करण्यात येत आहे. ठेकेदारांकडून यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्ल्यूडी) किंवा जिल्हा परिषदेकडून कुठल्याही प्रकारची परवानगी घेतली जात नाही. पाइप टाकण्याच्या अगोदर संबंधित विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र घेऊनच रस्त्यांची खोदाई करणे आवश्यक आहे. परंतु, काम लवकर उरकण्याच्या मानसिकतेमुळे याला बगल देऊन थेट रस्त्यांची खोदाईच केली जात असल्याचे चित्र आहे.

तर जलजीवनची कामे लवकर पूर्ण करण्यासाठी शासनाचा दबाव असल्याने उद्दिष्ट पूर्ण करण्यामध्ये प्रशासन व्यस्त आहे. रस्ते खोदाईबाबतीत जिल्हा परिषदेचे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश खताळ म्हणाले, ’ठेकेदारांनी रस्त्यांची खोदाई करण्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी घेणे गरजेचे असते. याबाबत आम्ही ठेकेदारांना सूचना देखील
केलेल्या आहेत.’

दरम्यान, जिल्ह्यात 1 हजार 224 जलजीवनची कामे सुरू आहेत. यापैकी काही कामे पूर्ण करण्याचा कालावधी संपत आला आहे. त्यामुळे हाती असलेल्या कालावधीमध्ये कामे पूर्ण करण्याचा सपाटाच ठेकेदारांनी लावला आहे. काही ठिकाणी तर अर्धी कामे करून झालेल्या कामांचे बिल काढण्याचा प्रकार देखील होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. याबाबत काही गावकर्‍यांनी हरकती देखील जिल्हा परिषदेकडे नोंदविल्या आहेत. एखाद्या कामाबाबत परवानगी मागितल्यानंतर पीडब्ल्यूडीकडूनही परवानगीचे कामे वेळेत करणे हे तेवढेच गरजेचे आहे.

हे ही वाचा : 

गुड न्यूज ! पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग सुरूच राहणार

पुणे : ‘पिन’ मिळवत मोलकरणीने ज्येष्ठ महिलेच्या एटीएममधून काढले पाच लाख

Back to top button