लोकसभा मतदारसंघावरील भाजपच्या दाव्यांमुळे शिंदे गट अस्वस्थ | पुढारी

लोकसभा मतदारसंघावरील भाजपच्या दाव्यांमुळे शिंदे गट अस्वस्थ

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : आगामी लोकसभा आणि विधानसभेची तयारी भाजपने सुरु केली असून मतदारसंघनिहाय निवडणूक प्रमुख नियुक्त करीत अप्रत्यक्षपणे स्वबळाचा नारा दिला आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गटात अस्वस्था निर्माण झालेली दिसून येते. युतीत मिठाचा खडा टाकण्याचे काम स्थानिक नेते करीत असल्याचा आरोप करीत खासदार श्रीकांत शिंदे यांनी राजीनामा देण्याची भाषा करून भाजपच्या ठाणे जिल्ह्यातील नेत्यांवर संताप व्यक्त केला आहे. याची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे, कल्याण लोकसभेसह राज्यातील सर्व जागांचा आढावा घेण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे सेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार संजय केळकर यांच्यावर निशाणा साधून गल्लीतील नेत्याच्या वक्तव्यांना महत्व देत नसल्याचे स्पष्ट केले.

सर्वाधिक भाजपचे उमेदवार उभे करण्याची रणनीती

भाजपचे निवडणूक मिशन सुरु झाले असून ४८ लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केले आहे. शिवसेना शिंदे गटाची तशी तयारी दिसून येत नाही. भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून शिंदे गटाचे खासदार असलेल्या मतदार संघावर कसे दावे ठोकता येईल, या रणनीतीनुसार काम सुरु झाले असताना भाजपचे सर्व मतदार संघांसाठी निवडणूक प्रमुख नियुक्तही केले आहेत. तसेच शिंदे गटाच्या खासदारांना कमळ चिन्हावर निवडणूक लढविण्यास सांगितले जाऊ शकते का? त्याचे काय परिणाम होऊ शकतात? याबाबत चाचपणीही सुरु झाली आहे. शिवसेना ठाकरे गट राष्ट्रवादी आणि काँग्रेसची महाविकास आघाडी यांची ताकद ही काही मतदारसंघात शिंदे गटाला त्रासदायक ठरू शकते, याची माहिती सर्वेद्वारे भाजपला मिळालेली आहे. परिणामी लोकसभा जिंकायची असल्यास शिंदे गटाच्या उमेदवाराला भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवावी लागेल, यासंदर्भात मुंबई, कोकणासह राज्यात वातावरण तयार केले जात आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यातील बालेकिल्ल्यातही भाजपकडून वशीच रणनीती राबविण्यासाठी वातावरण निर्माण केले जात आहे. मुख्यमंत्री शिंदे यांचे सुपुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघावर भाजपचा डोळा आहे. भाजपचे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, आमदार संजय केळकर यांनी मतदारसंघ बांधणीचे काम हाती घेतले आहे. त्यात भाजपचे डोंबिवली अध्यक्ष नंदू जोशी यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्याने भाजप आणि शिंदे गटाचे संबंध ताणले आहेत. त्यातून डोंबिवली, कल्याण ग्रामीण, दिवा येथे दोन्ही पक्षांच्या कार्यकत्यांमधे वाद रंगले आहेत. कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार शिंदे यांचे काम करायचे नाही आणि भाजप ठरवेल तो उमेदवार असेल अशी भूमिका स्थानिक नेत्यांनी घेतली आहे. तसेच आमदार संजय केळकर यांनी ठाणे जिल्हा हा भाजपचा बालेकिल्ला होता आणि आहे याची आठवण करून देत शिवसेनेच्या शिंदे गटाला डिवचले आहे.

सर्वाधिक भाजपचे उमेदवार उभे करण्याची रणनीती

कोकणात भाजप पेक्षा शिंदे गटाची अधिक ताकद असल्याचा दावा केला जात आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघ हा ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांच्या ताब्यात असून कल्याणमध्ये शिंदे गटाचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे व पालघर लोकसभा ही शिंदे गटाचे राजेंद्र गावित यांच्याकडे आहे. भिवंडी लोकसभेवर भाजपचे राज्यमंत्री कपिल पाटील यांचे वर्चस्व असून रायगडला राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे, सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत हे प्रतिनिधित्व करतात. ही आकडेवारी पाहता भाजपकडे फक्त एकच खासदार आहे. आता शिवसेनेची विभागणी झाल्याने सर्वाधिक लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार उभे करण्याची रणनीती आखली जात असून त्यानुसार काम ही सुरु झाले आहे. त्याचवेळी शिंदे गटाकडून लोकसभेची तयारी दिसत नसल्याने भाजपची रणनीती राबविली जाण्याचा संशय अधिक बळावला आहे.

Back to top button