Ashadhi wari : सकाळी सव्वासहाला माऊलींची पालखी पुण्याकडे मार्गस्थ; आळंदीकरांचा भावपूर्ण निरोप | पुढारी

Ashadhi wari : सकाळी सव्वासहाला माऊलींची पालखी पुण्याकडे मार्गस्थ; आळंदीकरांचा भावपूर्ण निरोप

श्रीकांत बोरावके 

आळंदी :

तुला साद आली तुझ्या लेकरांची

अलंकापुरी आज भारावली

वसा वारीचा घेतला पावलांनी

आम्हा वाळवंटी तुझी सावली

गळाभेट घेण्या भिमेची निघाली

तुझ्या नामघोषात इंद्रायणी

माहेर घराचा निरोप घेत माउलींची पालखी आज  सोमवारी (दि.१२) सकाळी सव्वासहाच्या सुमरास पुण्याकडे मार्गस्थ झाली. यावेळी सर्व आळंदीकर आपल्या माऊलींना निरोप देताना भारावले होते. महिनाभराचा दुरावा ठेवत माऊली पुण्याकडे मार्गस्थ झाली. इंद्रायणी माउलींची साद घेत वाहत असणारी इंद्रायणी चंद्रभागेला गळाभेट घेण्यासाठी जोरदार पणे वाहत असल्याचे आज काहीसे चित्र होते.

हरिनामाच्या गजरात काल मंगळवारी सायंकाळी पावणे सातच्या सुमारास पालखीचे प्रस्थान झाले होते. तद्नंतर ती पहिल्या मुक्कामासाठी जुन्या गांधी वाडा आजोळ घराच्या व आत्ताच्या नवीन दर्शनबारी मंडपात दाखल झाली होती. सकाळी नित्य धार्मिक विधी उरकत शितोळे सरकार यांच्या वतीने नैवद्य दाखविल्या नंतर पालखी सव्वा सहाच्या सुमारास पुण्याकडे मार्गस्थ झाली. यावेळी रस्त्यांच्या दुतर्फा भाविकांनी पालखी दर्शनासाठी गर्दी केली होती.

यावेळी वारकऱ्यांसाठी पंचक्रोशीतील गावकऱ्यांनी चहा, नाष्टा व फळे मोफत उपलब्ध करून देत वारीत आपला सहभाग नोंदवला. सकाळी आठच्या सुमारास पालखी विसाव्यासाठी थोरल्या पादुका मंदिर, भोसरी फाटा, साईमंदिर येथे विसावली येथे समाज आरती घेण्यात आली. तदनंतर पालखी दुपारच्या विसाव्यासाठी फुलेनगरकडे रवाना झाली. चऱ्होली, वडमुख वाडी, चोवीसावाडी, दिघी मँगझिन, साई मंदिर आदी भागातील नागरिकांसह पंचक्रोशीतील मोशी, डुडुळगाव, चिंबळी, कुरुळी, मोई, केळगाव, मरकळ,सोळु, धानोरे, गोलेगाव आदी गावांतून नागरिक माऊलीना निरोप द्यायला पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते.

पोलिसांच्यावतीने पालखी मार्गावर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जशी जशी पालखी पुढे मार्गस्थ होत होती तशी तशी मागील मागील रस्ते वाहतुकीसाठी खुले केले जात होते. पेरणी लांबल्याने यंदा वारकऱ्यांची संख्या कमी असल्याने रस्ते लगेच वाहतुकी साठी मोकळे होत होते.

हेही वाचा

वकील, पोलिस, साक्षीदारांमुळे देशात दीड कोटींवर खटले प्रलंबित

ठाणे भाजपचाच बालेकिल्ला; भाजप नेत्यांचा सूर

Back to top button