गनिमी काव्यामुळेच बर्‍याच गोष्टी न बोलता करता येतात : मुख्यमंत्री | पुढारी

गनिमी काव्यामुळेच बर्‍याच गोष्टी न बोलता करता येतात : मुख्यमंत्री

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सर्वांना गनिमी कावा शिकविला आहे. या गनिमी काव्यामुळे काही गोष्टी आपल्याला न बोलता करता येतात, असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकार स्थापन केलेल्या कृतीचे समर्थन केले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या 350 व्या वर्षानिमित्त राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते राजभवन मुंबई येथे एका विशेष टपाल तिकीटाचे प्रकाशन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा, शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

शिवसृष्टीसाठी 50 कोटी

शिवाजी महाराजांचे कार्य भावी पिढ्यांसमोर आणण्याच्या दृष्टीने प्रतापगडासह इतर गडकिल्ल्यांच्या संवर्धनाला प्राधान्य देण्याचे शासनाने ठरवले असल्याचे सांगून शिवसृष्टीसाठी रायगडाजवळील 85 एकर जमीन देणार आहे. त्यासाठी 50 कोटी रुपये देण्याचा शासनाने निर्णय घेतला असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.

शिवराय द्रष्टे महानायक : राज्यपाल

लोककल्याणकारी राजे छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण भारताचे महानायक होते. परकीय शक्तींकडून असलेले धोके ओळखून त्यांनी सुरतेवर आक्रमण केले. शिवाजी महाराज आणखी 20 वर्षे जगले असते तर भारताचा इतिहास पूर्ण वेगळा राहिला असता, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी यावेळी केले.

शिवाजी महाराज युगपुरुष : देवेंद्र फडणवीस

शिवाजी महाराज युगपुरुष होते. महाराजांनी प्रभू रामाप्रमाणे सामान्य माणसांकडून असामान्य काम करून घेतले असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत काही लोक वाद निर्माण करीत आहेत. त्यांना त्यांचेच नेते शरद पवार यांनी उत्तर दिलेय. त्यासंदर्भात 350 वा राज्यभिषेक असा हॅशटॅगही वापरल्याचे फडणवीस म्हणाले. रयतेचे राज्य प्रस्थापित करण्यासाठी शासन पुढेही कार्य करेल असे त्यांनी सांगितले.

Back to top button