‘एनआयआरएफ’मध्ये शैक्षणिक संस्थांची मोठी घसरण! | पुढारी

‘एनआयआरएफ’मध्ये शैक्षणिक संस्थांची मोठी घसरण!

पुणे; पुढारी वृत्तसेवा : नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क अर्थात ‘एनआयआरएफ’मध्ये सर्वसाधारण यादीतील पहिल्या शंभर उच्च शिक्षण संस्थांमध्ये यंदा राज्यातील शैक्षणिक संस्थांची मोठी घसरण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. केवळ 11 संस्थांना पहिल्या शंभरात स्थान मिळवता आले आहे. क्रमवारीमध्ये आयआयटी मुंबईची एका स्थानाने घसरण झाली आहे. अन्य संस्थांच्या स्थानांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा लक्षणीय घसरण झाली आहे. त्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ 35 व्या स्थानावर, तर मुंबई विद्यापीठ 96 व्या स्थानावर फेकले गेल्याचे दिसून येत आहे.

केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री डॉ. राजकुमार रंजन सिंग यांनी 2023 चे एनआयआरएफ सोमवारी (दि. 5) जाहीर केले. संशोधन आणि व्यावसायिकता, अध्ययन आणि स्रोत, अध्यापन, प्रचार आणि सर्वसमावेशकता अशा निकषांवर देशभरातील संस्थांचे मूल्यमापन करण्यात आले. आयआयटी मद्रास, बंगळूरची इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, आयआयटी दिल्ली, आयआयटी मुंबई, आयआयटी कानपूर, दिल्लीची ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, आयआयटी खरगपूर, आयआयटी रुरकी, आयआयटी गुवाहाटी आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठ या संस्था देशांतील पहिल्या दहा संस्थांमध्ये आहेत.

राज्यातील शिक्षण संस्थांचा विचार केल्यास आयआयटी मुंबईचे स्थान गेल्या वर्षीच्या तुलनेत एका स्थानाने घसरले आहे. तर अन्य संस्थांच्या क्रमवारीत मोठी उलथापालथ झाली आहे. विद्यापीठ गटातील पहिल्या साठ विद्यापीठांत राज्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला 19 वे, मुंबईचे इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीला 23 वे, मुंबईचे होमी भाभा नॅशनल इन्स्टिट्यूटला 17वे, पुण्यातील सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाला 32 वे, पुण्याच्या डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाला 46 वे, मुंबई विद्यापीठाला 56 वे स्थान मिळाले आहे.

पहिल्या शंभरमध्ये राज्यातील केवळ 11 संस्था

दंतवैद्यकीय गटात डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ तिसर्‍या स्थानी दंतवैद्यकीय गटातील 50 शैक्षणिक संस्थांमध्ये डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ तिसर्‍या, शासकीय दंतवैद्यकीय महाविद्यालय नागपूर 15 व्या, नायर हॉस्पिटल दंतवैद्यकीय महाविद्यालय 19 व्या, शासकीय दंतवैद्यकीय महाविद्यालय मुंबई 29 व्या, पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ मुंबई 38 व्या, भारती विद्यापीठ दंतवैद्यकीय महाविद्यालय आणि हॉस्पिटल 39 व्या स्थानी आहे. इनोव्हेशनच्या संस्थांत आयआयटी मुंबईचा समावेश आहे.

Back to top button