जयप्रभा स्टुडिओ प्रकरणी सरकारने अहवाल मागवला | पुढारी

जयप्रभा स्टुडिओ प्रकरणी सरकारने अहवाल मागवला

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : जयप्रभा स्टुडिओ प्रकरणी राज्याच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकार्‍यांकडे अहवाल मागवला आहे. तसे पत्र 1 जून रोजी पाठवले आहे. यामुळे जयप्रभा स्टुडिओचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर येण्याची शक्यता आहे.

जयप्रभा स्टुडिओची 15 फेब—ुवारी 2020 रोजी विक्री झाली. काही महिन्यांनंतर ही बाब उघडकीस येताच कोल्हापुरात संतापाची लाट उसळली. स्टुडिओची जागा परत घेण्यासाठी कोल्हापूरकर रस्त्यावरही आले. विविध आंदोलने झाली. चित्रपट महामंडळाने साखळी उपोषण सुरू केले. पर्यायी जागा दिली तर स्टुडिओची जागा शासनाच्या ताब्यात देण्याची तयारी खरेदीदारांनी दाखवली होती. या सर्व पार्श्वभूमीवर तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी याप्रकरणी तोडगा काढण्याची ग्वाही दिली होती.

दरम्यान, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. यानंतर चित्रपट महामंडळाने 26 जुलै 2022 रोजी शिंदे यांना जयप्रभा स्टुडिओ शासनाच्या ताब्यात घ्यावा आणि संबधितांना पर्यायी जागा द्यावी, अशी मागणी करणारे पत्र दिले. हे पत्र पुढील कार्यवाहीसाठी राज्य शासनाच्या पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाकडे आले आहे. या विभागाने जयप्रभा स्टुडिओबाबत महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यावर कार्यवाही सुरू झाली आहे.

Back to top button