इअरबडस्च्या अतिवापरामुळे त्याला ऐकू येणेच थांबले! | पुढारी

इअरबडस्च्या अतिवापरामुळे त्याला ऐकू येणेच थांबले!

गोरखपूर : सध्या अनेकांना, विशषेतः तरुणाईला हेडफोन्स, इअरबडस् कानाला लावून संगीत ऐकणे, मोबाईल वापरणे याची सवय लागली आहे. या उपकरणांमुळे ऐकण्याची क्षमता कमी होत असल्याचे अनेक प्रकरणांमधून समोर आले आहे. असाच प्रकार उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये घडला आहे. इअरफोनच्या अतिवापरामुळे एक तरुण ऐकण्याची क्षमताच गमावून बसला होता. सुदैवाने शस्त्रक्रियेनंतर त्याची ही क्षमता परत आली!

उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील एका 18 वर्षांच्या मुलाची बराच वेळ इअरबडस् वापरल्याने श्रवणशक्ती कमी झाली होती. मात्र, शस्त्रक्रियेनंतर मुलाची श्रवणशक्ती पूर्वीप्रमाणे झाल्याने कुटुंबीयांना दिलासा मिळाला आहे. जेव्हा लोक बर्‍याच वेळासाठी इअरबडस् वापरतात, तेव्हा कानाच्या आतील आर्द्रता वाढते, ज्यामुळे बॅक्टेरिया आणि विषाणूंना वाढण्यासाठी पोषक वातावरण मिळते.

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, आपल्या शरीराप्रमाणेच कानातही हवा खेळती राहणे आवश्यक आहे. ते जास्त काळ बंद ठेवल्याने घाम जमा होतो आणि त्यानंतर संसर्ग होतो.आपल्या शरीराप्रमाणेच कानातही ‘व्हेंटिलेशन’ची गरज असते. जेव्हा लोक बराच काळ इअरबडस् वापरतात तेव्हा कानामध्ये आर्द्रता वाढते. कान बराच वेळ झाकून ठेवल्याने घाम येतो आणि त्यानंतर संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे जर तुम्ही इअरबडस् वापरत असाल तर तुम्ही सावध राहायला हवे.

जवळजवळ सर्व तरुण रुग्णांमध्ये, कमी ऐकू येण्याचे प्रमुख कारण म्हणजे सतत इअरफोन किंवा हेडफोन लावून मोठ्या आवाजात गाणी किंवा व्हिडीओ पाहणे आणि ऐकणे हेच आहे. कानात शिट्टीसारखा आवाज येत असल्याने अनेक रुग्ण त्रस्त होतात. तसेच मोठ्या आवाजामुळे कानाच्या पेशींचे नुकसान होते. यासोबत, संसर्गाचा धोका वाढतो. वाहनांचा कर्कश आवाज आ हॉर्नमुळे आधीच समस्या वाढत होत्या, आता इअरफोन्समुळे त्यात वाढ होऊ लागली आहे.

Back to top button