एकनाथ खडसेंची पंकजा मुंडेंसोबत अर्धा तास चर्चा, नेमकं काय कारण? | पुढारी

एकनाथ खडसेंची पंकजा मुंडेंसोबत अर्धा तास चर्चा, नेमकं काय कारण?

जळगाव : भाजप नेत्या पंकजा मुंडे या गेल्या काही दिवसांपासून पक्षात नाराज असल्याची चर्चा आहे. त्यांनी नुकतीच जाहीररीत्या आपली नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या नवव्या पुण्यस्मरणानिमित्त गोपीनाथ गडावर जाऊन मुंडे यांच्या समाधीचं दर्शन घेतलं. त्यानंतर एकनाथ खडसे यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची त्यांच्या यशश्री निवासस्थानी जावून भेट घेतली. यावेळी पंकजा मुंडे यांच्यासोबत रोहिणी खडसे आणि प्रीतम मुंडे यांची देखील उपस्थिती होती. पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे यांच्यामध्ये यावेळी बंद दाराआड चर्चा झाली. पंकजा यांनी नुकतंच मी भाजपची नाही तर भाजप पक्षात मी आहे. भाजप हा मोठा पक्ष आहे, असं वक्तव्य केलं होतं.

जुन्या कार्यकर्त्यांचा भाजपात छळ

दरम्यान, या भेटीआधी त्यांनी पंकजा मुंडे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. खडसे म्हणाले की, पंकजा मुंडे यांचे विधान दुःखद आणि वेदनादायी आहे. पंकजा मुंडे यांनी ज्या शब्दांमध्ये आपली उद्विग्नता व्यक्त केली ती अतिशय वेदनादायी आहे. गोपीनाथ मुंडे यांच्यासह पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांनी पक्षासाठी उभं आयुष्य घातलं. पंकजा मुंडे यांची अशी अवस्था असणं म्हणजे भाजपमध्ये अस्वस्थता आहे. भाजप पक्ष वर्षानुवर्ष ज्यांनी वाढवला, बहुजनांपर्यंत पोहोचला, अशा जुन्या कार्यकर्त्यांचा भाजपात छळ होतोय, असे एकनाथ खडसे म्हणाले.

हेही वाचा :

Back to top button