पाण्यासाठी आसुसली कर्जत-जामखेडची गावे; शेतकर्‍यांमध्ये चिंतेचे वातावरण | पुढारी

पाण्यासाठी आसुसली कर्जत-जामखेडची गावे; शेतकर्‍यांमध्ये चिंतेचे वातावरण

कर्जत(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : उन्हाळ्याची तीव्रता वाढत असल्याने कर्जत-जामखेड मतदारसंघात पाण्याची पातळीही खालावत आहे. या पार्श्वभूमीवर पिण्यासाठी आणि सिंचनासाठी कुकडी आणि सीना कालव्यातून सोडण्यात येणार्‍या पाण्याचे योग्य नियोजन करण्याची, शेतीसोबतच पिण्याच्या पाण्याचे स्रोतही भरण्याची आणि आवर्तनाचा कालावधी वाढवण्याची मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे. याबाबतचे पत्र त्यांनी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांना भेटून दिले आहे.

कर्जत-जामखेड हा अवर्षणग्रस्त भाग आहे. उन्हाळ्यात या भागातील भूगर्भातील पाणीपातळी मोठ्या प्रमाणात खालावते. त्यामुळे सिंचनासाठी आणि पिण्यासाठी कुकडी आणि सीना या कालव्यांचा मोठा आधार आहे. परंतु सद्यःस्थितीत नियोजनाअभावी सर्व गावांना पाणी मिळेल की नाही, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

भोसे खिंडीतून सीना धरणात कुकडीचे पाणी सोडण्याची मागणी आमदार रोहित पवार यांनी केली होती. जेणेकरून सीना कालव्याचे आवर्तन पूर्ण दाबाने सोडता आले असते आणि कालव्याच्या शेवटच्या गावांनाही पूर्ण दाबाने सिंचनासाठी पाणी मिळाले असते. परंतु ही मागणी मान्य केली नाही. त्यामुळे सध्या सीना कालव्यातून आवर्तन सोडलेले असतानाही ते पूर्ण दाबाने मिळत नाही. त्यामुळे निमगाव डाकू, नवसारवाडी, पाटेवाडी, आनंदवाडी, तरडगाव ही अखेरची पाच-सहा गावे या आवर्तनापासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे.

कुकडी कालव्याच्या 165 किलोमीटरला जो दाब 600 ते 650 क्यूसेक पाहिजे तो अजूनही 400 क्यूसेकच्या पुढे गेला नसल्याने कुकडी लाभक्षेत्रातील टेलच्या भागात ती अजूनही झाली नाही. यामुळे शेतातील उभे पीक आणि फळबागा डोळ्यासमोर सुकत असल्याचे पाहून त्या वाचविण्यासाठी धडपड करणार्‍या शेतकर्‍यांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, पिण्याच्या पाण्यावाचून लोकांना त्रास होऊ नये यासाठी आमदार रोहित पवार यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघातील 22 ते 23 गावांमध्ये टँकरची सोय केली आहे.

भोसे खिंडीतून कुकडीचे पाणी सीना धरणात सोडण्याची मागणी आमदार रोहित पवार यांनी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत केली. ही मागणी मान्य करून समितीच्या अध्यक्षांनी जलपसंदा विभागाला तसे आदेश दिले असते तर पाण्याचे योग्य नियोजन करण्यास मदत झाली असती आणि आज पाण्यापासून वंचित राहण्याची वेळ आमच्या गावांवर आली नसती, अशा शब्दांत टेलच्या गावांतील शेतकरी नाराजी व्यक्त करत आहेत. सध्या लोकांना आणि जनावरांनाही पिण्याचे पाणी, चारा पिके तसेच फळबागा यासाठी पाण्याची अत्यंत गरज आहे.

त्यामुळे या आवर्तनाचे योग्य नियोजन केले नाही तर अनेक गावे वंचित राहू शकतात, अशी भीती आहे. परिणामी कुकडी आणि सीना कालव्यावरील गावांमधील हजारो हेक्टर क्षेत्रावरील चारापिके आणि बहुवार्षिक पीक असलेल्या फळबागा उत्पादक शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होऊ शकते.

पाणी असूनही त्याचे योग्य नियोजन केले नाही. कुकडी व सीनाच्या आवर्तनाच्या नियोजनाची चर्चा कालवा सल्लागार समितीच्या बैठकीतही झाली होती. आता जिल्हाधिकार्‍यांनाही विनंती केली आहे. पिण्याच्या पाण्याचे स्रोतही भरण्याची मागणी केली आहे. यावर जिल्हाधिकारी योग्य सूचना देतील असा विश्वास आहे.

– आमदार रोहित पवार

Back to top button