Odisha triple train crash | ओडिशा रेल्वे अपघात, मृतांचा आकडा २८८ वर, पीएम मोदींनी बोलावली तातडीची बैठक | पुढारी

Odisha triple train crash | ओडिशा रेल्वे अपघात, मृतांचा आकडा २८८ वर, पीएम मोदींनी बोलावली तातडीची बैठक

भुवनेश्वर; पुढारी ऑनलाईन : भारतातील सर्वात भीषण रेल्वे अपघातांपैकी एक असलेल्या ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यातील तिहेरी रेल्वे अपघातातील मृतांचा आकडा २८८ वर पोहोचला आहे. एकापाठोपाठ तीन रेल्वे गाड्यांची धडक होऊन हा अपघात झाला. तर सुमारे ९०० लोक जखमी झाले आहेत. घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे. (Odisha triple train crash)

ओडिशा अग्निशमन सेवेचे महासंचालक सुधांशू सारंगी यांनी एएफपी वृत्तसंस्थेशी घटनास्थळावरून बोलताना सांगितले की, मृतांची संख्या २८८ वर आहे. “बचावकार्य अजूनही सुरू आहे. मोठ्या संख्येने लोक जखमी झाले आहेत.”

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेल्वे अपघाताच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलावली आहे, असे वृत्त एएनआयने सरकारी सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे. जखमी प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी आणि उपचारासाठी भारतीय लष्करालाही तैनात करण्यात आले आहे. (Odisha train accident)

या घटनेचे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनीही घटनास्थळी जाऊन पाहणी केली. ओडिशातील रेल्वे अपघातस्थळी असलेल्या रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटले आहे की, “आता आमचे लक्ष बचाव आणि मदत कार्यावर आहे.” या रेल्वे अपघाताचे कारण तपासानंतर कळेल, असेही ते म्हणाले.

कोलकात्यापासून दक्षिणेस सुमारे २५० किमी आणि भुवनेश्वरपासून उत्तरेस १७० किमी अंतरावर बालासोर जिल्ह्यातील बहनागा बाजार स्टेशनजवळ शुक्रवारी संध्याकाळी ७ च्या सुमारास हा भीषण रेल्वे अपघात झाला.

रेल्वे अपघाताची चौकशी दक्षिण पूर्व सर्कलचे रेल्वे सुरक्षा आयुक्त ए एम चौधरी यांच्या नेतृत्वाखाली केली जाईल, असे भारतीय रेल्वेने एका निवेदनात म्हटले आहे. १२८६४ बंगळूर-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेसचे अनेक डबे हावडा मार्गावर रुळावरून घसरले आणि लगतच्या रुळांवर पडले, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. “हे रुळावरून घसरलेले डबे १२८४१ शालीमार-चेन्नई सेंट्रल कोरोमंडल एक्स्प्रेसला धडकले आणि तिचे डबेही उलटले,” असेही सांगण्यात आले आहे.

दरम्यान, घटनास्थळी एनडीआरफची ७, ओडीआरएएफची ५ (Odisha Disaster Rapid Action Force) आणि फायर सर्व्हिसची २४ युनिट्स, स्थानिक पोलीस आणि स्वयंसेवक शोध आणि बचावकार्य करत असल्याचे ओडिशाचे मुख्य सचिव प्रदीप जेना यांनी सांगितले.
या घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना १० लाख, गंभीर जखमींना २ लाख आणि किरकोळ जखमी झालेल्यांना ५० हजार रुपयांची मदत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी जाहीर केली आहे. (coromandel express train accident)

हे ही वाचा :

Back to top button