मडगाव-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधान मोदी शनिवारी दाखवणार हिरवा झेंडा | पुढारी

मडगाव-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधान मोदी शनिवारी दाखवणार हिरवा झेंडा

मडगाव, पुढारी वृत्तसेवा : कोकण रेल्वे मार्गावरील मडगाव ते मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान चालवण्यात येणाऱ्या सेमी हाय स्पीड वंदे भारत एक्सप्रेसच्या दिनांक 3 जून रोजीच्या उद्घाटन विशेष गाडीचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. या गाडीला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सकाळी ११ वाजून ५ मिनिटांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हिरवा झेंडा दाखवणार आहेत.

कोकण रेल्वेच्या मार्गावर ठिकठिकाणी होणारे स्वागत स्वीकारून वंदे भारत एक्सप्रेस ७ तास ५५ मिनिटांमध्ये गोवा ते मुंबई हा संपूर्ण प्रवास पार करेल, असे वेळापत्रक आखण्यात आले आहे. सायंकाळी सहा वाजून ५० मिनिटांनी शुभारंभाची ही गाडी मुंबईतील सीएसएमटी जंक्शनवर पोहोचणे अपेक्षित आहे.

दिनांक ३ जूनची मडगाव -मुंबई गाडीची शुभारंभाची फेरी असल्यामुळे या गाडीतून केवळ निमंत्रितांना प्रवास करता येणार आहे. गाडीचे नियमित वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल अशी माहिती रेल्वे सूत्रांकडून देण्यात आली. दरम्यान, वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर गोव्यात मडगाव स्थानकावर जोरदार तयारी करण्यात आली आहे. ही गाडी मडगाव स्थानकातून ज्या फलाटावरून सुटणार आहे त्या फलाटासह ट्रॅक ची देखील रंगरंगोटी करण्यात आली आहे.

कोकणातील दऱ्याखोऱ्यांमधून महाराष्ट्राची राजधानी मुंबईच्या दिशेने दोडणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसची पहिली छबी टिपण्यासाठी युट्युबवर्स, हौशी छायाचित्रकार तसेच रेल फॅन्स आपले कॅमेरे सेट करून तयार आहे. याच बरोबर कोकण वासियांमध्ये देखील वंदे भारत एक्सप्रेस संदर्भात कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. या गाडीच्या उद्घाटनानंतर नियमित वेळापत्रक कधी जाहीर होते, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचंलत का?

Back to top button