सासऱ्याच्या अनैतिक संबंधाना सुनेचा विरोध…! सुनेचा नातीसमोर गळा, तोंड दाबून केला खून | पुढारी

सासऱ्याच्या अनैतिक संबंधाना सुनेचा विरोध...! सुनेचा नातीसमोर गळा, तोंड दाबून केला खून

राजगुरुनगर (पुणे), पुढारी वृत्तसेवा: अनैतिक संबंधाना विरोध केल्याने सासऱ्याने आपल्या नातीसमोर सुनेचा गळा आणि तोंड दाबून खून केला. या घटनेने खेड तालुक्यात खळबळ उडाली आहे. वाफगाव (ता. खेड) येथील कुरणेवस्ती येथे ही घटना घडली आहे. मेघा रंगनाथ कोळी (वय ३४) असे झालेल्या सुनेचे नाव आहे, तर दिनकर मल्हारी कोळी असे नराधम सासऱ्याचे नाव आहे. सोमवारी (दि. २९) हा प्रकार घडला आहे. सासऱ्याचे एका बाहेरच्या महिलेशी संबंध होते. समाजात बदनामी होईल म्हणुन सुनेने वारंवार केलेल्या विरोधामुळे हा प्रकार घडला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आरोपी सासरा दिनकर कोळी याचे जवळ राहणाऱ्या एका महिलेशी आनैतिक संबंध होते. मात्र हे संबंध दिनकर यांची सून मेघा हिला मान्य नव्हते. तिने सासऱ्याला अनेकदा विरोधही केला होता. सोमवारी दिनकर पुन्हा त्या महिलेकडे जात असताना सुनेने त्यांना हटकले. त्याचा सासऱ्याला राग आला. राग अनावर झाल्याने त्याने सुनेचा गळा आणि तोंड दाबून खून केला. ज्यावेळी खून केला, त्यावेळी त्यांची सात वर्षांची चिमुकली नात समोरच होती. तिने पोलिस जबाबात ही माहिती दिली आहे. या प्रकरणी दिनकर कोळी याच्यावर राजगुरुनगर पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने संपूर्ण खेड तालुक्यात खळबळ उडाली आहे. सासऱ्याने केलेल्या कृत्याचा निषेध करण्यात येत आहे.

Back to top button