‘मविआ’ म्हणजे अलिबाबा चाळीस चोर ! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | पुढारी

‘मविआ’ म्हणजे अलिबाबा चाळीस चोर ! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : मागचे सरकार भ्रष्टाचार्‍यांचे सरकार होते. त्यांचे मंत्री जेलमध्ये चाललेत. जनहिताचा विचार कोणी करीत नव्हते, मुख्यमंत्री घरात होते आणि मंत्री मनमानी कारभार करीत होते. म्हणून शिंदे यांच्याबरोबर आपण युतीचे सरकार केले. आता हे अलिबाबा चाळीस चोर कितीही एकत्र आले, तरी ते पंतप्रधान मोदी यांना हरवू शकत नाहीत, अशी घणाघाती टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी महाविकास आघाडीवर केली.

भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकार्‍यांच्या मेळाव्यात फडणवीस बोलत होते. महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार राम शिंदे, खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्यासह जिल्ह्यातील भाजप आमदार, पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. महाविकास आघाडीचा उल्लेख महावसुली आघाडी असा करत फडणवीस यांनी जोरदार टीका केली. ते म्हणाले, की ते कितीही एकत्र आले, तरी मोदींना हरवू शकत नाहीत. ममता बॅनर्जी नगरला आल्या किंवा शरद पवार मणीपूरला गेले, तर त्यांना पाहायला किंवा ऐकायला कोण जाईल़? मात्र पंतप्रधान मोदी कुठेही गेले, तरी त्यांना पाहायला, ऐकायला लाखोंची गर्दी होते.

तुमचा एक नेता कोण एवढी जरी हे ठरवू शकले, तरी एक वेळ लोक यांना मते देतील; पण हे एकत्र राहूच शकत नाहीत. फक्त सत्ताच त्यांना एकत्र आणू शकते. सत्ता आणि पैसा यांना एकत्र आणणारे चुंबक आहे. हे चुंबकच मोदींनी काढून घेतले आहे, असे फडणवीस म्हणाले. युती सरकारने गेल्या दहा महिन्यांमध्ये राबविलेल्या विविध योजनांची माहिती देऊन या योजना जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम भाजपच्या कार्यकर्त्यांनी करणे गरजेचे आहे, असे आवाहन करून फडणवीस म्हणाले, की भाजप कार्यकर्ता सरकार आणि जनतेतील सेतू झाला पाहिजे. कार्यकर्त्यांकडे पुढील एक वर्ष मी पक्षासाठी नव्हे, तर देशासाठी मागतो आहे.

हे एक वर्ष भारतासाठी, पुढच्या पिढ्यांसाठी आहेत. छोट्या छोट्या गोष्टींवर नाराज न होता, मोदी यांन पुन्हा पंतप्रधान करायचे हे एकच ध्येय आहे. राज्यातील लोकसभेच्या 42 पेक्षा जास्त जागा मिळवायच्या आहेत. ‘देव, देश अन् धर्मासाठी सर्वस्व द्यायचंय’, असे आवाहन त्यांनी केले. सर्वप्रथम आमदार राम शिंदे यांचे भाषण झाले. ते म्हणाले, की भाजपमध्ये संवाद आहेच. पण सुसंवाद राहिला पाहिजे, म्हणून फडणवीस इथे आले आहेत. सध्या सत्तेत पक्षाचे जिल्ह्यातील केवळ दोन आमदार आहेत. ही संख्या वाढवण्यासाठी आपल्याला झोकून देऊन काम करायचे आहे आणि नरेंद्र मोदी यांना तिसर्‍यांदा पंतप्रधान करायचे आहे.

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ‘जिल्ह्यात शत-प्रतिशत भाजप’ असा नारा दिला. यापुढे जिल्ह्यातील सर्व निवडणुका भाजप जिंकल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ‘जाणता राजात अस्तित्वाच्या शोधात आहे,’ अशी टीका करून ‘आघाड्या कितीही झाल्या, तरी भाजपचा पराभव करण्याची ताकद कोणातही नाही,’ असेही ते म्हणाले.

Back to top button