भंडारा : हरविलेल्या मुलीच्या शोधात खुनाचे आरोपी जाळ्यात, तिघांना अटक | पुढारी

भंडारा : हरविलेल्या मुलीच्या शोधात खुनाचे आरोपी जाळ्यात, तिघांना अटक

भंडारा, पुढारी वृत्तसेवा : बेपत्ता झालेल्या तरुणीचा शोध घेत असताना तिचा खून करून मृतदेहाची विल्हेवाट लावणा-या तीन आरोपींना पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखा आणि गोबरवाही पोलिसांना यश आले आहे. तब्बल चार वर्षानंतर तरुणीच्या खुनाचा छडा लावण्यात पोलिस यशस्वी झाले आहेत. संजय चित्तरंजन बोरकर (वय ४७, रा. कवलेवाडा ता. तुमसर), राजकुमार उर्फ राजू चित्तरंजन बोरकर (५०, रा. कवलेवाडा), धरम फागू सयाम (४२, रा. मोहगाव टोला ता. तुमसर) अशी अटक करण्यात आलेल्या संशयीत आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० एप्रिल २०१९ रोजी अर्चना माणिक राऊत (२३, रा. कवलेवाडा, ता. तुमसर) ही तरुणी बेपत्ता झाल्याने तिचे वडिल माणिक राऊत यांच्या तक्रारीवरुन गोबरवाही पोलिसात नोंद करण्यात आली होती. अर्चना ही नेहमीप्रमाणे संजय चित्तरंजन बोरकर याच्या घरी कामावर गेली होती. परंतु कामावरून परत आपल्या घरी परत न आल्याने तिचे आई-वडील संजय बोरकर याच्या घरी जाऊन चौकशी केली असता त्याने अर्चना ही दुपारीच गेल्याचे सांगितले. परंतु, मुलीची चप्पल ही त्याच्या घराच्या मागच्या बाजुच्या दरवाज्याजवळ व पिवळ्या रंगाचा दुपट्टा दोरीवर लटकलेला दिसला. त्यावर अर्चनाच्या आईने त्याला चप्पल व दुपट्टयाबाबत विचारले असता संजय बोरकरने ओरडून आपल्या घरी निघून जा, असे बजावून त्यांना घरी जाण्यास भाग पाडले.

या गुन्ह्याचा तपास करताना प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार घटनेच्या दिवशी आरोपी संजय बोरकर हा घाबरलेल्या स्थितीत आपल्या घरुन मृतदेह पुरण्याकरीता रात्री १० च्या सुमारास सब्बल व फावडा घेवून गेला. यावेळी साक्षीदाराने संशयीत संजयचा पाठलाग केला असता चिखला माईन्स येथे अर्चनाचा मृतदेश पुरण्याकरिता खड्डा खणत असताना त्याठिकाणी संजय बोरकरसह राजकुमार उर्फ राजू चित्तरंजन बोरकर आणि धरम फागु सयाम हे दिसले. साक्षीदाराने संशयीत आरोपींचा पाठलाग करत असल्याचे दिसताच आरोपी संजय बोरकरने साक्षीदाराला धमकी दिली. त्यामुळे तो घाबरलेल्या अवस्थेत परत निघाला. ही संपूर्ण हकीकत साक्षदाराने पोलिसांना सांगितल्यानंतर संजय बोरकर, राजकुमार बोरकर आणि धरम सयाम यांच्याविरुध्द पोलिस स्टेशन गोबरवाही येथे भादंविच्या कलम ३०२, २०१, ३४ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. तपास गोबरवाहीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन मदनकर करीत आहेत.

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक नितीन चिंचोळकर, गोबरवाहीचे ठाणेदार नितीन मदनकर, नारायण तुरकुडे, प्रिती कुळमेथे, नितीन महाजन, रमेश बेदुरकर, नंदकिशोर मारबते, मनोज साकुरे, नेपाल गभने, आशिष तिवाडे, योगेश पेठे, आशीष श्रावणकर, कौशीक गजभिये यांनी केली.

Back to top button