राणाचे प्रत्यार्पण | पुढारी

राणाचे प्रत्यार्पण

मुंबईवरील 26/11 चा दहशतवादी हल्ला ही भारताच्या हृदयावरील खोलवरची जखम असून, ती बरी झाली असली, तरी जुन्या दुखण्याप्रमाणे अधूनमधून तिचा ठणका जाणवत असतो. या हल्ल्याचा तपास पूर्ण झाला. हल्ल्यातील सहभागी दहशतवादी मारले गेले, जिवंत पकडलेला एकमेव दहशतवादी अजमल कसाबला फाशी देण्यात आली. तरीसुद्धा काही अनुत्तरित प्रश्न डोके वर काढीत असतात. अर्थात, हा हल्ला म्हणजे कुठून तरी दहशतवादी आले, हल्ला केला, त्यांना ठार केले किंवा शिक्षा केली म्हणजे प्रकरणावर पडदा पडला एवढे साधे सरळ नाही. त्यामागे आंतरराष्ट्रीय पातळीवरील मोठे षड्यंत्र असून, त्यात सहभागी झालेल्या अनेकांचा हिशेब अद्याप बाकी आहे.

त्यात पाकिस्तानातील हाफिज सईदपासून तहव्वूर राणापर्यंत अनेकांचा समावेश आहे. त्यापैकीच एक असलेल्या आणि मुंबई हल्ल्यातील सहभागाप्रकरणी शिक्षा भोगत असलेल्या तहव्वूर हुसैन राणा याच्या प्रत्यार्पणाला अमेरिकेतील न्यायालयाने नुकतीच मंजुरी दिली. घटनेला पंधरा वर्षे उलटून गेल्यामुळे आणि यातील प्रमुख सहभागींचा निकाल लागल्यामुळे अनेक संदर्भ पुसट झालेले असतात. त्यामुळे राणा, डेव्हिड हेडली ही नावे विस्मृतीत गेलेली असू शकतात. राणासंदर्भात अनेकांच्या बाबतीत तसे झालेले असू शकते.

पाकिस्तानमध्ये जन्मलेला राणा कॅनडाचा नागरिक आणि दहशतवादी हल्ल्यातील दुसरा महत्त्वाचा आरोपी हेडलीचा मित्र आहे. हेडलीसह मुंबईवर हल्ला घडवून आणल्याच्या आणि हल्ल्याची योजना आखल्याच्या आरोपाखाली राणा 2013 मध्ये दोषी आढळला होता. अमेरिकन न्यायालयाने त्याला 14 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. त्याच्या प्रत्यार्पणासाठी भारत सरकारने अमेरिकेला विनंती केली होती. त्यानुसार न्यायालयाने प्रत्यार्पणास मंजुरी दिली. परंतु, राणाला त्याविरुद्ध अपील करण्याची संधी आहे. तो अपील करणार किंवा नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मुंबईवरील 26 नोव्हेंबरच्या दहशतवादी हल्ल्यात 164 जणांचा मृत्यू झाला, या कारवाईत नऊ दहशतवादीही ठार झाले. हे दहशतवादी लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचा भारताचा आरोप आहे.

एकीकडे अजमल कसाबविरोधातील खटला सुरू असतानाच दुसरीकडे समांतर तपासही सुरू होता. त्यातूनच पाकिस्तानी-अमेरिकन नागरिक असलेल्या डेव्हिड हेडलीबाबतच्या तपासातून तहव्वूर हुसैन राणा याचे नाव वारंवार समोर येत होते. शिकागो येथे चार आठवडे चाललेल्या खटल्यादरम्यान राणासंदर्भातील बरीचशी माहिती समोर आली होती. वैशिष्ट्य म्हणजे या प्रकरणात राणाविरुद्ध हेडली सरकारी साक्षीदार झाला. मुंबई हल्ल्याच्या नियोजनाबाबत हेडलीने तपशीलवार साक्ष दिली आणि त्याच्यासह राणाच्या सहभागावरही प्रकाश टाकला. त्याच्याविरोधातील खटला, प्रत्यार्पणाचा निकाल, हे यश भारताच्या दहशतवादाविरोधातील कायदेशीर लढ्याचे मोठे यश मानले जाते. अर्थात अर्धी लढाई जिंकली असली तरी.

हेडली आणि राणा यांचे प्रकरण नीटपणे समजून घेताना मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याशी संबंधित अनेक धागे उलगडत जातात. हल्ल्यात जे ठार झाले, त्यामध्ये सहा अमेरिकन नागरिकांचा समावेश होता. त्यामुळे अमेरिकन नागरिकांना ठार करण्यासाठी मदत करण्याबरोबरच अन्य बारा आरोप सिद्ध झाल्यामुळे राणाला शिक्षा सुनावण्यात आली. ‘एफबीआय’ या अमेरिकन तपास यंत्रणेने ऑक्टोबर 2009 मध्ये राणा आणि हेडली या दोघांना शिकागो विमानतळावरून ताब्यात घेतले होते. डेन्मार्कमधील एका वृत्तपत्राने वादग्रस्त व्यंगचित्र प्रसिद्ध केले होते, त्यामुळे भावना दुखावल्याने हे दोघे संबंधित वृत्तपत्राच्या कार्यालयावर हल्ला करण्यासाठी डेन्मार्कला जात असताना दोघांना पकडण्यात आले होते.

अटक केल्यानंतर ‘एफबीआय’ने केलेल्या या दोघांच्या चौकशीतून मुंबईवरील हल्ल्यामध्ये त्यांचा सहभाग असल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. म्हणजे, ‘एफबीआय’च्या कचाट्यात ते सापडले नसते, तर त्यांचा कटातील सहभाग समोर आला असता किंवा नाही याबाबतच शंका उपस्थित होते. दोन वेगवेगळ्या कटांत सहभागी असल्याबद्दल राणाला चौदा वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. मुंबई हल्ल्याचा कट रचण्याबरोबरच ‘डॅनिश’ वृत्तपत्रावरील हल्ल्याची योजना आखण्यासाठी मदत केल्याबद्दल राणा दोषी आढळला. हेडलीने पाकिस्तानमधील लष्कर-ए-तोयबाच्या प्रशिक्षण शिबिरांमध्ये भाग घेतल्याचे अटकेनंतरच्या निवेदनात राणाने कबूल केले. राणाच्या साक्षीमुळे हेडलीलाही कबुली द्यावी लागली. त्याने दिलेल्या कबुलीनुसार 2002 ते 2005 दरम्यान पाकिस्तानमधील ‘लष्कर-ए-तोयबा’च्या प्रशिक्षण शिबिरांमध्ये तो पाच वेळा सहभागी झाला होता. 2005 नंतर हेडलीने पाच वेळा भारताला भेट दिली होती. भारतात

कुठे-कुठे हल्ला करता येईल, यासंदर्भात राणाशी चर्चा करून चाचपणी केल्याची साक्ष हेडलीने दिली होती. शिवाय, हेडली आणि ‘लष्कर-ए-तोयबा’च्या दोन सदस्यांनी त्यांच्या कारवायांसाठी मुंबईत इमिग्रेशन कार्यालय सुरू करण्यासंदर्भात चर्चा केली होती. हेडलीने मुंबईवर हल्ला करण्याची तयारी सुरू केली, तेव्हा तो अनेकदा रेकीसाठी मुंबईत येऊन गेला. आपल्या वारंवार येण्याचा कुणाला संशय येऊ नये, यासाठी त्याने राणाच्या ट्रॅव्हल एजन्सीची मुंबईत शाखा उघडली. या एकूण प्रकरणात हेडलीने राणाचा वापर करून घेतल्याचे तपास अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. दोघेही बालपणापासूनचे मित्र असूनही जेव्हा प्रसंग आला, तेव्हा हेडलीने सरकारी साक्षीदार बनून राणाला अडकवले.

राणाच्या वकिलानेही हेडलीवर तशाच प्रकारचा आरोप केला असून, हेडली हा अत्यंत धूर्त आणि कटकारस्थानी माणूस असल्याचे म्हटले आहे. अर्थात, हेडलीला खलनायक ठरवून राणाचे निर्दोषत्व सिद्ध होत नाही. आपण नेमके काय करीत आहोत आणि त्याचे परिणाम काय होतील, याची त्याला पूर्ण कल्पना होती. केलेल्या कृत्याची शिक्षा तो भोगत आहे. त्याच्या प्रत्यार्पणाला अमेरिकन न्यायालयाने परवानगी दिली, ते प्रत्यक्षात होण्याबाबत संदिग्धता असली, तरी त्यामुळे नव्याने त्याच्या कृत्यांना उजाळा जसा मिळाला, तसेच पाकिस्तानच्या भारतातील दहशतवादी कारवायांनाही. त्या आजही थांबलेल्या नाहीत, हे त्यामागचे जळजळीत वास्तव.

Back to top button