G- 20 Summit : जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये आजपासून G20 शिखर परिषद; कडेकोट बंदोबस्त, ६० देशांचे प्रतिनिधी राहणार उपस्थित | पुढारी

G- 20 Summit : जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये आजपासून G20 शिखर परिषद; कडेकोट बंदोबस्त, ६० देशांचे प्रतिनिधी राहणार उपस्थित

पुढारी ऑनलाईन डेस्क : जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये G20 देशांच्या पर्यटन कार्यगटाची तिसरी बैठक आजपासून (दि.२२) सुरू होत आहे. या परिषदेसाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. दाल सरोवराच्या किनारी शेर-ए-काश्मीर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर (SKICC) येथे होणार आहे. या कार्यक्रमाला G20 देशांतील 60 प्रतिनिधींसह 180 हून अधिक प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

लालचौकसह शहरातील अनेक भागात एनएसजी कमांडोंचा पाहारा आहे. दल सरोवराच्या काठावरील बुलेवर्ड रोडवर तीन दिवस वाहतुकीवर निर्बंध असणार आहेत. दरम्यान, आंतरराष्ट्रीय सीमेवरून (आयबी) नियंत्रण रेषेपर्यंत (एलओसी) सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कठुआ, सांबा, जम्मू, राजोरी, पुंछ, बारामुल्ला, कुपवाडा आणि बांदीपोरा या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये जवानांना आयबी आणि नियंत्रण रेषेवर अधिक सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

आजपासून 24 मे पर्यंत होणाऱ्या परिषदेच्या पहिल्या दिवशी सर्व देशांचे प्रतिनिधी दुपारी SKICC येथे पोहोचतील. सांस्कृतिक कार्यक्रमांनी त्यांचे स्वागत होणार आहे. उद्या चित्रपट पर्यटनाला चालना मिळावी यासाठी आर्थिक विकास आणि सांस्कृतिक जतन या विषयावर सत्र होणार आहे. यासोबतच इको टुरिझम या विषयावर स्वतंत्र सत्र होणार आहे.

परी महल आणि मुघल गार्डनला प्रतिनिधी भेट देणार

G-20 मध्ये सहभागी होणारे प्रतिनिधी परी महल, चष्माशाही आणि मुघल गार्डनला भेट देणार आहेत. यासोबतच नुकतेच नूतनीकरण करण्यात आलेल्या पोलो व्ह्यू मार्केटलाही ते भेट देणार आहेत.

पर्यटन, साहस, चित्रपट आणि इको टुरिझमला चालना मिळेल

आजपासून होणाऱ्या तीन दिवसीय G20 शिखर परिषदेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. केंद्र सरकार आणि जम्मू-काश्मीर प्रशासनाला आशा आहे की या कार्यक्रमामुळे या प्रदेशाच्या पर्यटनाला, चित्रपट आणि इको-टूरिझमला मोठी चालना मिळेल. यामुळे स्थानिक तरुणांना संधीचे अनेक मार्ग खुले होतील. यासोबतच जम्मू-काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यास मदत होईल. रविवारी श्रीनगरमधील शेर-ए-काश्मीर इंटरनॅशनल कॉन्फरन्स सेंटर (SKICC) येथे पत्रकार परिषदेत G20 कार्यक्रमाचे मुख्य समन्वयक हर्षवर्धन श्रृंगला यांनी या गोष्टी सांगितल्या. येथे 22 ते 24 मे दरम्यान G20 ची बैठक होणार आहे.

हेही वाचा : 

Back to top button