भ्रष्टाचारी म्हणून संबोधले त्याच नेत्यांशी केजरीवालांची हातमिळवणी : दिल्लीतील भाजप खासदारांचे टीकास्त्र | पुढारी

भ्रष्टाचारी म्हणून संबोधले त्याच नेत्यांशी केजरीवालांची हातमिळवणी : दिल्लीतील भाजप खासदारांचे टीकास्त्र

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : आप नेते अरविंद केजरीवाल यांनी ज्या नेत्यांना भ्रष्टाचारी म्हणून संबोधत आंदोलन सुरू केले होते, त्याच नेत्यांच्या हातात आता ते हात घालत असल्याची टीका दिल्लीतील भाजपच्या सर्वच्या सर्व सात खासदारांनी आज ( दि. 21) पत्रकार परिषद घेऊन केली.

केजरीवाल हे देशातले सर्वात भ्रष्ट नेते आहेत. पंतप्रधान मोदी यांना मात देण्यासाठी ते आता इतर भ्रष्ट नेत्यांची मदत घेत आहेत, असे माजी केंद्रीय मंत्री व खासदार हर्षवर्धन यांनी यावेळी सांगितले. संयुक्त जनता दलाचे नेते व बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज, केजरीवाल यांची भेट घेत विरोधी एकतेवर चर्चा केली. याच्या काही वेळातच भाजप खासदारांनी पत्रकार परिषद घेऊन केजरीवाल यांच्यावर टीकास्त्र सोडले.

अरविंद केजरीवाल यांनी फाटली चप्पल घालून भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाला सुरुवात केली होती. त्यावेळी केजरीवाल यांनी शरद पवार, कपिल सिब्बल, लालूप्रसाद यादव, फारूक अब्दुल्ला आदी नेत्यांना विरोध केला होता, यातील काही नेत्यांना भेटायला केजरीवाल जाणार आहेत. केजरीवाल यांच्याजवळ जो जो गेला आहे, त्याची दुर्गती झाली आहे. त्यामुळे नितीश कुमार यांची आपणास दया येत आहे, असे खा. मनोज तिवारी यांनी सांगितले. आतापर्यंत आपण वेगवेगळ्या मुख्यमंत्र्यांचा कार्यकाळ पाहिला आहे, मात्र केजरीवाल यांच्यासारखा व्यवहार पाहिला नाही. 8 मोठ्या अधिकाऱ्यांनी उपराज्यपालांना पत्र लिहून प्रताडीत केले जात असल्याचे म्हटले आहे, यापेक्षा दुर्दैवी बाब कोणती असू शकेल, असे खा. हर्षवर्धन म्हणाले.

केजरीवाल यांच्यामुळे दिल्लीची स्थिती हास्यास्पद झाली आहे. दिल्ली आणि देशाची प्रतिमा खराब होऊ नये, यासाठी केंद्र सरकारने अध्यादेश आणला आहे, असा युक्तिवाद खा. रमेश विदुडी यांनी केला. प्रवेश वर्मा आणि हंस राज हंस यांनीही यावेळी केजरीवाल यांच्यावर टीका केली.

हेही वाचा : 

 

 

 

Back to top button