सांगा, घर कसे चालवावे? अंगणवाडीताईंचा सवाल | पुढारी

सांगा, घर कसे चालवावे? अंगणवाडीताईंचा सवाल

पुणे; पुढारी वृत्तसेवा : एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत अंगणवाडी कर्मचार्‍यांचे मार्च महिन्यापासून मानधन थकले आहे. अंगणवाडी सेविकांबरोबरच इतर कर्मचार्‍यांचेदेखील मानधन न मिळाल्याने कर्मचार्‍यांना समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे अंगणवाडी सेविकांनी सांगितले. एकात्मिक बालविकास सेवायोजनेत काम करणार्‍या अंगणवाडी सेविका, मिनी सेविका, मदतनीस यांना वेळेवर आणि दरमहा मानधन मिळावे म्हणून शासनाने पीएफएमएस प्रणाली अंतर्गत मानधन देण्याची आयुक्तस्तरावर यंत्रणा तयार केली.

काही महिने नियमित मानधन अंगणवाडी कर्मचार्‍यांना मिळाले. परंतु, मार्चपासून मात्र शासनस्तरावरून मानधन न मिळाल्यामुळे अंगणवाडी कर्मचार्‍यांची उपासमार होत आहे. दोन-दोन महिने मानधन मिळाले नाही, त्यामुळे अंगणवाडी कर्मचार्‍यांनी घर कसे चालवायचे? असा संतप्त सवाल सेविकांनी केला आहे.

आमच्या घरातील चुली कशा पेटणार?

अंगणवाडीसेविका अनिता गुंजाळ म्हणाल्या, ’दोन दोन महिने पगार नाही. आम्ही करावे तरी काय? काय म्हणून लागत नाही घरात आणि आजारपण असेल तर परिस्थिती गंभीर होत आहे. आमच्या अनेकींच्या घरात मानधन नसल्याने अंधारच होण्याची वेळ आली आहे. मिळते तेवढ्या मानधनात कसेतरी घर चालते, पुन्हा ते वेळेत न दिल्यामुळे उसनवारी करावी लागते.’ अंगणवाडीसेविका नयना वाळुंज म्हणाल्या, ’राज्य शासनाकडून मिळणारे मानधन मार्चपासून वेळेत नाही. अंगणवाडी कर्मचार्‍यांच्या घरातील चुली कशा पेटणार? विधवा परित्यक्ता महिलांचे हाल होत आहेत. आहार शिजविण्यासाठीच्या इंधनाची बिलेदेखील रखडली आहेत. तीही वेळेत मिळत नाहीत.’

मानधन देण्याची व्यवस्था शासनाने तातडीने करावी; अन्यथा नाइलाजास्तव भर उन्हाळ्यात अंगणवाडी कर्मचार्‍यांना आमदार, खासदारांच्या घरासमोर उपोषण करावे लागेल.

                             – नीलेश दातखिळे, उपाध्यक्ष,
                   महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ

Back to top button