Sunil Gavaskar : गावसकर जोफ्रा आर्चरवर भडकले, म्हणाले; ‘त्याला एक पैसाही देऊ नका’ | पुढारी

Sunil Gavaskar : गावसकर जोफ्रा आर्चरवर भडकले, म्हणाले; ‘त्याला एक पैसाही देऊ नका’

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबई इंडियन्सचा (MI) वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने आयपीएलमध्येच सोडून इंग्लंड गाठले. त्याच्या अशा जाण्याने भारताचे माजी दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावसकर (Sunil Gavaskar) चांगलेच भडकले आहेत. आर्चरला फ्रँचायझीने एक पैसाही देऊ नये, अशी संतप्त प्रतिक्रिया देत त्यांनी इंग्लिश गोलंदाजाचे वाभाडे काढले आहेत.

आयपीएल 2022 च्या आधी झालेल्या मेगा लिलावात मुंबईने आर्चरला 8 कोटी रुपयांना विकत घेतले. पण दुखापतीमुळे तो त्या मोसमात एकही सामना खेळू शकला नाही. त्यानंतर आयपीएल 2023 मध्ये मुंबईला आर्चरकडून खूप आशा होत्या पण त्याने निराशा केली. त्याने मुंबई इंडियन्ससाठी 5 सामने खेळले. पण त्याचा मारा प्रभावी ठरला नाही. त्याने संघासह एमआयच्या चाहत्यांची निराशा केली. त्याला केवळ 2 विकेट्स घेता आल्या. अखेरीस दुखापतीच्या कारणास्तव आर्चरने पुन्हा एकदा मैदान निम्म्यावर सोडले आणि मायदेशी इंग्लंडला परतला. आता तो जूनपासून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ॲशेस मालिकेतूनही बाहेर पडला आहे.

आर्चरने मुंबई कॅम्प सोडताच भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी नाराजी व्यक्त केली आहे. संपूर्ण स्पर्धेसाठी खेळाडू उपलब्ध न झाल्यास कठोर कारवाई करावी, असे त्यांनी परखड मत व्यक्त केले आहे. एका इंग्रजी वृत्तपत्रासाठी लिहिलेल्या लेखात त्यांनी आर्चवर जोरदार टीका केली आहे. ते म्हणतात, ‘मुंबई इंडियन्ससाठी जोफ्रा आर्चरचा अनुभव कसा होता? तो दुखापतग्रस्त असूनही आयपीएलच्या 16 व्या हंगामात तो उपलब्ध होईल अशी आशा बळगून फ्रँचायझीने धोका पत्करला. त्यांनी आर्चरसाठी मोठी रक्कम मोजली. त्या बदल्यात वेगवान गोलंदाजाने काय दिले? खरेतर इंग्लिश गोलंदाज आर्चर हा 100 टक्के तंदुरुस्त दिसत नव्हता. ही गोष्ट त्याने जाणूनबुजून लपवली का? आपल्या दुखापतीविषयीची माहिती त्याने फ्रेंचायझीला द्यायला हवी होती. पण त्याने तसे केले नाही. ही एक प्रकारची फसवणूक आहे. त्यामुळे फ्रँचायझीनेही त्याला एक पैसाही देऊ नये,’ असा सल्ला गावसकरांनी दिला आहे.

सुनील गावसकर पुढे म्हणाले, ‘टूर्नामेंट सुरू असताना तो उपचारासाठी परदेशात गेला होता, असे ईसीबीने सांगितले होते. त्यामुळे तो कधीच पूर्णपणे तंदुरुस्त नव्हता हे सिद्ध होते. जर त्याने फ्रँचायझी सोबत करार केला आहे, ज्यातून त्याला ईसीबीपेक्षा जास्त पैसे मिळतात, अशा परिस्थितीत आर्चरने शेवटपर्यंत टिकून राहायला हवे होते. पण फ्रँचायझीशी बांधिलकी दाखवण्याऐवजी त्याने इंग्लंडला परत जाणे पसंत केले.’

Back to top button