IND vs AFG ODI: डब्ल्यूटीसी फायनलनंतर टीम इंडिया जूनमध्ये खेळणार ‘ही’ मालिका, जाणून घ्या वेळापत्रक | पुढारी

IND vs AFG ODI: डब्ल्यूटीसी फायनलनंतर टीम इंडिया जूनमध्ये खेळणार ‘ही’ मालिका, जाणून घ्या वेळापत्रक

पुढारी ऑनलाईन डेस्क : IND vs AFG ODI : टीम इंडियाचे सर्व खेळाडू सध्या आयपीएल खेळण्यात व्यस्त आहेत. ही स्पर्धा आता शेवटच्या टप्प्यात आली असून लीगमधील फक्त चार ते पाच सामने शिल्लक आहेत, त्यानंतर क्वालिफायर आणि एलिमिनेटर खेळले जातील. 28 मे रोजी आयपीएलचा अंतिम सामना रंगणार आहे. त्यानंतर 7 जूनपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळवला जाईल, ज्यामध्ये भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ इंग्लंडमधील ओव्हलवर आमनेसामने येतील.

हा सामना 11 जून रोजी संपणार आहे. जर पावसाने व्यत्यय आणला तर हा सामना 12 जून पर्यंत खेळवला जाईल. यानंतर टीम इंडिया काय करणार? आत्तापर्यंतच्या वेळापत्रकानुसार भारतीय संघ जुलैमध्ये वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर जाणार असला तरी त्याला अजून उशीर झाला आहे. दरम्यान, भारतीय संघ जूनमध्येच दुसरी मालिका खेळणार असल्याची बातमी आहे. त्याचे वेळापत्रक अद्याप आलेले नसले तरी संभाव्य तारखा नक्कीच समोर आल्या आहेत.

टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान वनडे मालिका

WTC फायनलनंतर भारतीय संघ जूनमध्येच अफगाणिस्तान विरुद्ध वनडे मालिका खेळण्याची योजना आखत आहे. बीसीसीआय आणि अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड या मालिकेसाठी तयार असून लवकरच सामन्यांच्या तारखा जाहीर केल्या जाऊ शकतात. (IND vs AFG ODI)

यावर्षी भारतात वनडे वर्ल्ड कपचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे सामने ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान खेळवले जाणार आहेत. त्यामुळे ही जागतिक स्पर्धा लक्षात घेऊन अफगानिस्तानविरुद्धची वनडे मालिका निश्चित करण्यात आल्याचे समजते आहे. ही मालिका फक्त भारतात खेळवली जाणार असून त्यात तीन वनडे सामने खेळले जाणार असल्याचे वृत्त आहे. विशेष म्हणजे आयसीसीच्या भविष्यातील कार्यक्रमात या मालिकेचा कुठेही उल्लेख करण्यात आलेला नाही.

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांची वनडे मालिका 16 जूनपासून म्हणजेच जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीनंतर चार ते पाच दिवसांनी सुरू होऊ शकते. पण यात बदलही होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून जूनच्या अखेरीस ही मालिका संपवण्यात येणार असल्याचे बीसीसीआयने निश्चित केले आहे. या मालिकेचे सामने भारतात कोणत्या चॅनलवर दाखवले जातील हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र वेळापत्रक निश्चित होताच बीसीसीआयकडून याबाबतची घोषणा केली जाऊ शकते, असे कळते. (IND vs AFG ODI)

भारत विरुद्ध अफगाणिस्तान मालिकेत टीम इंडियाच्या मोठ्या खेळाडूंना विश्रांती

दरम्यान, या मालिकेसाठी टीम इंडियाच्या काही वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली जाऊ शकते. कारण भारतातील जवळपास सर्वच मोठे खेळाडू सध्या आयपीएल खेळत आहेत आणि त्यातील 15 खेळाडू WTC च्या फायनलमध्ये खेळणार आहेत.

अशा परिस्थितीत विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना विश्रांती मिळण्याची शक्यता आहे. तसेच ज्या खेळाडूंनी आयपीएलच्या 16 व्या हंगामात चमकदार कामगिरी केली आहे, त्यांना अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेत संधी दिली जाईल असेही समजते आहे. यात यशस्वी जैस्वाल आणि रिंकू सिंग यांची नावे ठळकपणे समोर आली आहेत. तथापि, भारत विरुद्ध अफगाणिस्तान मालिका अद्याप सुरुवातीच्या टप्प्यावर आहे आणि बरीच घोषणा होणे बाकी आहे. या मालिकेबाबत बीसीसीआयकडून आणखी काय घोषणा होतात हे पाहावे लागेल.

Back to top button