पुण्यात भाजपची अनधिकृत फ्लेक्सबाजी | पुढारी

पुण्यात भाजपची अनधिकृत फ्लेक्सबाजी

पुणे; पुढारी वृत्तसेवा : भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीसाठी लावण्यात आलेल्या अनधिकृत फ्लेक्सबाजीमुळे जंगलीमहाराज रस्त्याचे अक्षरश: विद्रुपीकरण झाले होते. धक्कादायक म्हणजे महापालिकेने एकाही फलकासाठी परवानगी घेतली नसल्याचे स्पष्ट केले असतानाही भाजप प्रदेशाध्यक्षांनी मात्र प्रत्येक फलकासाठी परवानगी घेतली असल्याचा खोटा दावा केला. जंगलीमहाराज रस्त्यावरील बालगंधर्व रंगमंदिर येथे भाजप प्रदेश कार्यकारिणीची बैठक झाली.

तसेच घोले रस्त्यावरील नेहरू ऑडिटोरिअममध्ये काही बैठकांचे आयोजन केले होते. या सर्व कार्यक्रमांसाठी शहर भाजपने जोरदार तयारी केली होती. त्यात बैठकीसाठी आलेल्या नेत्यांचे आणि पदाधिकार्‍यांच्या स्वागतासाठी जंगली महाराज रस्त्यासह शिवाजीनगर परिसरात मोठ्या प्रमाणात जाहिरात फ्लेक्सबाजी करण्यात आली होती. शहराध्यक्षांपासून प्रदेश पातळीवरील नेत्यांपर्यंत आणि माजी नगरसेवकांपासून कार्यकर्त्यांमध्ये फलक लावण्याची स्पर्धाच रंगली होती. रस्त्याच्या दुतर्फा फलकच फलक दिसून येत होते. त्यामुळे या सगळ्या परिसराचे विद्रुपीकरण झाले होते.

वाहतूक कोंडीत भर

बैठकीसाठी आलेल्या पदाधिकार्‍यांच्या वाहनांसाठी नदीपात्रात पार्किंगची सोय करण्यात आली होती. मात्र, पदाधिकार्‍यांनी रस्त्यांवरच जागा मिळेल, त्याठिकाणी गाड्या लावल्याने वाहतूक कोंडीतही भर पडली. त्यामुळे जंगलीमहाराज रस्त्यावर दिवसभर वाहतूक कोंडी होती. त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागला. मात्र, वाहतूक पोलिसांनी मात्र कारवाई न करता केवळ सोईस्कर दुर्लक्ष करणेच पसंत केले.

पालकमंत्र्यांच्या भूमिकेकडे दुर्लक्ष

एकीकडे काही दिवसांपूर्वी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी माझे जरी अनधिकृत फलक दिसले, तरी ते काढून टाका, असे सांगितले होते. मात्र, भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पालकमंत्र्यांच्या भूमिकेकडे दुर्लक्ष केले असल्याचे दिसून आले.

Back to top button