मांडवगण फराटा : भीमा नदीला जलपर्णीचा विळखा | पुढारी

मांडवगण फराटा : भीमा नदीला जलपर्णीचा विळखा

मांडवगण फराटा : पुढारी वृत्तसेवा : शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील गावांच्या हद्दीतून वाहणार्‍या भीमा नदीचे पात्र जलपर्णीच्या विळख्यात अडकत चालले आहे. परिणामी, पाणी दूषित झाल्याने त्यात डासांची उत्पत्ती वाढली असून, पाण्याला दुर्गंधी सुटली आहे. त्याचा लगतच्या गावांतील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. नदीचे पाणी पिणार्‍या जनावरांच्या आरोग्यालाही धोका पोहचण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मांडवगण फराटा हद्दीत भीमा नदीपात्रातील कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा अडवला असून, त्यात मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. मात्र, या पाण्यावर हळूहळू जलपर्णी वाढू लागली आहे. बहुतांश नदीपात्र जलपर्णीने काबीज केले आहे, त्यामुळे पाणी दूषित झाले आहे. तर या जलपर्णीखाली डासांची उत्पत्ती वाढली आहे. वाढत्या उन्हामुळे जलपर्णी सुकून त्याची मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. जलपर्णी आणि दुर्गंधी यामुळे नदीपात्रातील मासेदेखील मोठ्या प्रमाणात मृत्युमुखी पडत आहेत. नदीतील पाणी पिल्याने जनावरांच्याही जीवाला धोका निर्माण झाला आहे.

मांडवगण फराटासह वडगाव रासाई, सादलगाव, रांजणगाव सांडस, बाभूळसर बुद्रुक, गणेगाव दुमाला, नागरगाव आदी गावे व तसेच दौंड तालुक्यातील भीमा नदीकाठावरील अनेक गावांमध्ये हीच परिस्थिती आहे. जलपर्णी हटविण्याबाबत परिसरातील ग्रामस्थांनी अनेकदा आवाज उठवला आहे. परंतु अद्यापि प्रशासन, तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्‍यांनी यावर कोणतीच उपयोजना केलेली नाही.

मुळा-मुठा नदीतीलदूषित पाण्याचा दरवर्षी त्रास

मुळा-मुठा नदीतून येणार्‍या दूषित पाण्यामुळे आम्हाला दरवर्षी हा त्रास सहन करावा लागतो. मात्र, त्यावर कोणत्याही उपाययोजना होत नाहीत. गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामस्थ सातत्याने पाठपुरावा करत असून नमामी चंद्रभागा योजनेचे कोणतेही काम अद्यापि सुरू झालेले नाही. प्रशासनाने याबाबत योग्य ती दखल घ्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

नदीत पोहण्याची गर्दी ओसरली

सध्या वाढत्या उष्म्यामुळे दुपारच्या वेळी थंडावा मिळविण्यासाठी तरुणाई विहिरी, तलावांमध्ये पोहण्यासाठी गर्दी करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. एकेकाळी उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पोहण्यासाठी नागरिकांची भीमा नदीवर गर्दी असायची. परंतु आता जलपर्णी व दूषित पाण्यामुळे दिवसेंदिवस नागरिकांचा पोहण्याचा ओढा कमी झालेला दिसून येत आहे.

Back to top button