सांगोला : शेतकऱ्यांनी आपल्या शेळ्या-मेंढ्या व जनावरांना लस टोचणी करून घ्यावी; डॉ. असलम सय्यद यांचे आवाहन | पुढारी

सांगोला : शेतकऱ्यांनी आपल्या शेळ्या-मेंढ्या व जनावरांना लस टोचणी करून घ्यावी; डॉ. असलम सय्यद यांचे आवाहन

सांगोला; पुढारी वृत्तसेवा : मान्सूनपूर्व नियोजीत उपक्रम हाती घेत, सांगोला तालुका पशु वैद्यकीय विभागामार्फत तालुक्यातील 1 लाख 04 हजार शेळ्या-मेंढ्यासाठी अंत्रविशार व लहान मोठ्या अशा एकूण 20 हजार जनावरांसाठी घटसर्प लस उपलब्ध झाली आहे. 24 पशुवैद्यकीय दवाखान्या मार्फत लसीकरण मोहीम सुरू करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी आपल्या शेळ्या-मेंढ्या व जनावरांना लस टोचणी करून घ्यावी असे आवाहन तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. असलम सय्यद यांनी केले आहे.

उन्हाळा व त्यानंतर हवामानात होणारे बदल तसेच पावसाळ्यात जानवरांना घटसर्प, लाळ व खुरकत यासारख्या आजाराची लक्षणे आढळून येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच शेळ्या मेंढ्या ना देखील अनेक आजार आढळून येतात. यावर मागणी केल्याप्रमाणे सांगोला तालुका पशुवैद्यकीय विभागाकडे शेळ्या – मेंढ्या व जनावरांसाठी 1 लाख 24 हजार लस उपलब्ध झाली असून तालुक्यातील 24 पशुवैद्यकीय दवाखान्या मार्फत लसीकरण मोहीम सुरू करण्यात आले आहे.

सांगोला तालुक्यात शेती उद्योगाबरोबर अनेक कुटुंबाचा जोड़ उद्योग म्हणून पशुपालन व्यावसाय सुरु आहे. तालुक्यात लहरीप्रमाणे पर्जन्यमान होत आसल्याने बहुतांश कुटुंबाचा उदरनिर्वाह हा पशुपालनावर सुरु आहे. तालुक्यात जरी पाणी टंचाई आसली तरी दूध उत्पादनात तालुका आघाडीवर आहे. तालुक्यात जर्शी गायचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे.

पशु विभागाच्या आकडेवारी नुसार सांगोला तालुक्यात सुमारे १ लाख 39 हजार गाय व म्हैस असल्याची नोंद पशु विभाग कडे आहे. या जनावरांना उपचार करण्यासाठी श्रेणी एकचे १५ व श्रेणी दोनचे ९ असे एकूण २४ पशु दवाखान्याच्या माध्यमातून प्रयत्न केला जातो आहे. मध्यंतरी लंपी या आजाराने थैमान घातले होते. या काळात तालुक्यातील 351 जनावरांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. लंपि आजारामुळे मृत्यू झालेल्या जनावरांच्या मालकांना शासकीय मदत अर्थात अनुदान वितरित करण्यात येत आहे. यासाठी पशु वैद्यकीय विभागामार्फत वरिष्ठांकडे पाठपुरावा सुरू आहे.

सांगोला तालुका पशु विभाग मार्फत मान्सूनपूर्व नियोजन करण्यात आले आहे. पावसाळ्यापूर्वी गावागावात तसेच पशु दवाखान्यांमध्ये जनावरांना लसीकरण करण्यात येणार आहे. यामध्ये पावसाळ्यात आणि थंडीच्या काळात घटसर्प, लाळ व कुरकत या सारख्या आजरांची लागण मोठ्या प्रमाणात होते. यावर उपाय योजना म्हणून शासनाकडून घटसर्प रोग नियंत्रण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. तालुक्यातील पशु दवाखान्यात लस उपलब्ध झाली असून जनावरांना लस टोचणी करण्यासाठी गावागावात शिबिराचे आयोजन केले जात आहे. पशुपालक शेतकऱ्यांनी आपल्या शेळ्या मेंढ्या व जनावरांना लसीकरण करून घ्यावे असे आवाहन तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ . असलम सय्यद यांनी केले आहे.

हवामानातील बदलामुळे शेळ्या मेंढ्या व जनावरांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होवू नये, रोग प्रादुर्भाव वाढू नये म्हणून अधिक काळजी घेत तालुका पशु वैद्यकीय विभागामार्फत आत्तापासूनच लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. 1 लाख 24 हजार शेळ्या – मेंढ्या व जनावरांसाठी लस उपलब्ध झाली असून तालुक्यातील पशु दवाखान्यात वितरित करण्यात आली आहे. गावागावात लसीकरण सुरू झाले आहे. यासह अधिक 30 हजार जनावरांसाठी ब्लॅक कॉरटर लसीची मागणी केली आहे.
– डॉ. असलम सय्यद, तालुका पशुवैद्यकीय अधिकारी

Back to top button