शेतकर्‍यांना शासनाने तातडीने मदत करावी ; आमदार शंकरराव गडाख | पुढारी

शेतकर्‍यांना शासनाने तातडीने मदत करावी ; आमदार शंकरराव गडाख

नेवासा  (नगर ): पुढारी वृत्तसेवा :  अवकाळी पाऊस, अतिवृष्टी यामुळे शेतीचे अतोनात नुकसान झालेले आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे. या शेतकर्‍यांना शासनाने तातडीने मदत करावी, अशी मागणी आमदार शंकरराव गडाख यांनी केली. नेवासा तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती व खरेदी विक्री संघ संचालकांचा सत्कार शनिवारी आमदार शंकरराव गडाख यांच्या हस्ते नेवासा येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार पांडुरंग अभंग होते. आमदार गडाख म्हणाले, गावागावांतील द्वेष, कटुता दूर सारत एकोप्याने संघटनेच्या वतीने सर्वसमावेशक उमेदवार दिले. मतदारांनी मोठ्या मताधिक्याने संघटनेच्या उमेदवारांना विजयी केले. याबद्दल मतदारांचे आभार मानले. तालुक्यातील विरोधकांना पूर्ण पॅनलही करता आला नाही. तालुक्यातील गावागावांत विकासकामे करण्यासाठी, जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले.

अवकाळी पाऊस, अतिवृष्टी यामुळे शेतीचे अतोनात नुकसान झालेले आहे. कांदा, सोयाबीनसह व सर्वच पिके वाया गेली आहेत. उत्पादन खर्चही निघाला नसल्याने शेतीची पुरती दुरवस्था झाली आहे. नेवासा तालुक्यातील 5 मंडलातील शेतकरी अजूनही अतिवृष्टी अनुदानापासून वंचित आहेत. शेतकर्‍यांना शासनाने तातडीने अतिवृष्टी अनुदान देऊन धीर द्यावा, अशी मागणी आमदार गडाख यांनी यावेळी केली.

याप्रसंगी बाजार समितीचे संचालक, खरेदी विक्री संघाचे संचालक, नगर पंचायतीचे नगरसेवक, मुळा कारखान्याचे संचालक आदींसह नेवासा तालुक्यातील विविध गावांतून आलेले सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालक, शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते. प्रास्ताविक माजी सभापती कारभारी जावळे यांनी केले.

अन्यथा अधिकार्‍यांना जाब विचारू
नेवासा शहराच्या सर्वागीण विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करणार आहे. प्रशासनाने तालुक्यातील शेतकर्‍यांच्या प्रश्नांची दखल न घेतल्यास तहसीलदार व शासकीय अधिकार्‍यांना रस्त्यावर येऊन जाब विचारल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही आमदार गडाख यांनी यावेळी दिला.

अन्यथा अधिकार्‍यांना जाब विचारू
नेवासा शहराच्या सर्वागीण विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करणार आहे. प्रशासनाने तालुक्यातील शेतकर्‍यांच्या प्रश्नांची दखल न घेतल्यास तहसीलदार व शासकीय अधिकार्‍यांना रस्त्यावर येऊन जाब विचारल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही आमदार गडाख यांनी यावेळी दिला.

Back to top button