बेळगाव : म. ए. समितीची पाटी कोरीच! | पुढारी

बेळगाव : म. ए. समितीची पाटी कोरीच!

बेळगाव, पुढारी वृत्तसेवा :  यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समिती किमान दोन जागांवर आपला झेंडा फडकावणार, असे वातावरण निर्माण झाले होते. पण, बेळगाव दक्षिण मतदारसंघातील तीव्र चुरस वगळता इतर ठिकाणी म. ए. समितीला निराशाच पदरी आली. सर्व पाचही जागांवर समितीला अपयश आले. त्यामुळे म. ए. समितीला आता नव्याने विचारमंथन करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. फक्त बेळगाव दक्षिण मतदारसंघात समितीचे रमाकांत कोंडुसकर यांनी विद्यमान आमदार भाजपचे अभय पाटील यांनी जोरदार टक्कर दिली, तरीही त्यांना 11 हजारांवर मतांनी पराभव पत्करावा लागला.

लोकसभा पोटनिवडणुकीत म. ए. समितीने सव्वा लाख मते मिळवून सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. त्यानंतर रिंगरोड, मराठी कागदपत्रे, महामेळावा आदी आंदोलनाच्या माध्यमातून सीमाभागात चांगले वातावरण निर्माण केले होते. सभांना मोठ्या प्रमाणात गर्दीही झाली होती. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांनी समितीचा प्रचार केला. त्यामुळे चांगला प्रतिसाद लाभला. पण, या गर्दीचे मतांत रूपांतर करता आले नाही.

म. ए. समितीने आपल्यातील बेकी मिटवावी, नवीन चेहरा द्यावा, कार्यकर्त्यांच्या या दोन प्रमुख मागण्या होत्या. म. ए. समिती नेत्यांनी या दोन्ही मागण्यांची पूर्तता केली. पण, प्रत्यक्षात अपेक्षित बदल झाला नाही. बेळगाव ग्रामीण, बेळगाव दक्षिण, बेळगाव उत्तर, खानापूर आणि यमकनमर्डी या पाच मतदारसंघात म. ए. समितीने उमेदवार दिले. पाचही ठिकाणी नवीन चेहरे होते. बेळगाव दक्षिण, बेळगाव ग्रामीण आणि खानापूर या तीन मतदारसंघात म. ए. समितीचे उमेदवार निवडून येतील, अशी अपेक्षा होती. मात्र बेळगाव दक्षिण मतदारसंघात दिलेली वगळता इतर सर्वच ठिकाणी समिती उमेदवारांना नामुष्कीजनक पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे म. ए. समिती नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना नव्याने विचारमंथन करण्यास भाग पडले आहे.

म. ए. समिती नेत्यांतील छुपी नाराजी आणि हातचे राखून प्रचार केल्यामुळे बुथ पातळीवरील नियोजन व्यवस्थित झाले नाही. त्याचा परिणाम म्हणून समिती उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. निवडणुका हा सीमालढ्याचाच भाग होता. यातून लोकेच्छा दाखवून देण्याची गरज होती. त्यामध्ये समिती नेते आणि मराठी लोक कमी पडल्याचे दिसून आले आहे.

म. ए. समिती उमेदवारांचे स्थान

रमाकांत कोंडुसकर (बेळगाव दक्षिण) : दुसर्‍या स्थानी
आर. एम. चौगुले (बेळगाव ग्रामीण) : तिसर्‍या स्थानी
अ‍ॅड. अमर यळ्ळूरकर (बेळगाव उत्तर) : तिसर्‍या स्थानी
मुरलीधर पाटील (खानापूर) : तिसर्‍या स्थानी
मारुती नाईक (यमकनमर्डी) : चौथ्या स्थानी

Back to top button