बेळगाव : उचगावच्या मळेकरणी देवस्थानमध्ये बकऱ्यांचा बळी देण्यास बंदी

बेळगाव : उचगावच्या मळेकरणी देवस्थानमध्ये बकऱ्यांचा बळी देण्यास बंदी

उचगाव; पुढारी वृत्तसेवा : उचगाव मळेकरणी देवस्थानमध्ये यापुढे बकऱ्यांचा बळी देण्याच्या प्रथेला निर्बंध घालण्यात आले असून उचगाव आणि परिसरात कोणालाही देवीच्या नावाने बकऱ्याला बळी देऊन मांसाहारी जेवणावळीची यात्रा करता येणार नाही. जर कोणी असे केल्यास त्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, असा ठराव करण्यात आला आहे. उचगाव ग्रामपंचायत, देसाई भाऊबंद कमिटी आणि ग्रामस्थ यांच्यात सोमवारी (दि.२७) झालेल्या बैठकीत बहुमताने हा ठराव केला. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी 'उचगाव ग्रामपंचायत' च्या अध्यक्षा मथुरा तेरसे ह्या होत्या.

उचगाव येथील गांधी चौकातील मध्यवर्ती गणेश विठ्ठल रखुमाई मंदिरामध्ये सोमवारी सकाळी उचगाव गावातील सर्व ग्रामस्थ, देसाई भाऊबंद कमिटी, ग्रामपंचायतचे सर्व सदस्य आजी-माजी अध्यक्ष उपाध्यक्ष या सर्वांच्या उपस्थितीमध्ये बैठक बोलावण्यात आली होती.

 उचगाव येथील प्रसिद्ध मळेकरणी देवस्थानात वर्षभर मंगळवार आणि शुक्रवार बकऱ्याचा बळी देऊन जेवणावळीचे मोठे कार्यक्रम होत असतात. मौजमस्तीसाठी या ठिकाणी अनेक जण मांसाहारीचा बेत आखतात. या यात्रेत भक्ती कमी आणि दारू मटणावरती जोर अधिक असल्याचे दिसून आले आहे. यात्रेमुळे देवीच्या नावाने देण्यात येणाऱ्या पशूबळीमुळे या बकऱ्यांचे अवशेष, रक्त आणि इतर टाकाऊ पदार्थ यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरून ग्रामस्थांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे. याबरोबरच वाहतुकीच्या कोंडीचाही स्थानिक नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

मळेकरणी देवी मंदिर परिसरात अनेक शेतकऱ्यांची शेती आहे. या शेतात यात्रेत येणारे तळीराम दारू पिऊन त्या बाटल्या तिथेच फोडून जातात. परिसरात होणाऱ्या कचऱ्यामुळे कुत्र्यांची संख्या अफाट वाढली आहे, यामुळे शाळेला जाणाऱ्या मुलांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. मद्यसेवन करून महिला आणि विद्यार्थींनीच्या छेडछाडीचे प्रकार या परिसरात घडल्याने ही यात्रा बंद करण्याचा निर्णय ग्रामस्थानी घेतला. देवीच्या मंदिरात येण्यासाठी कोणालाही बंदी नाही. प्रथेप्रमाणे देवीची ओटी भरणे, यासारख्या प्रथा सुरूच राहतील, असेही ग्रामपंचायत ठरावात सांगण्यात आले.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news