टेक इन्फो : कृत्रिम बुद्धिमत्तेच्या धोक्याचा घंटानाद | पुढारी

टेक इन्फो : कृत्रिम बुद्धिमत्तेच्या धोक्याचा घंटानाद

कृत्रिम बुद्धिमत्तेचे तंत्रज्ञान मानवी मेंदूपेक्षाही अधिक वेगाने निर्णय घेऊ शकेल. हे अत्यंत धोकादायक आहे, असे सांगत जेफ्री हिंटन यांनी ‘गुगल’चा राजीनामा दिला आहे. ‘एआय’विषयी जागतिक स्तरावरील अनेक तज्ज्ञांकडून यापूर्वीही असाच धोक्याचा इशारा दिला गेला होता. मात्र आता खुद्द या तंत्रज्ञानाचा गॉडफादर त्याकडे जगाचे लक्ष वेधून घेत असल्याने त्याचे गांभीर्य वाढले आहे.

आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता या शब्दाचा वापर सर्वप्रथम 1956 मध्ये न्यू हॅम्पशर राज्यातील डार्टमाऊथ कॉलेजमध्ये झालेल्या एका परिषदेमध्ये झाला. यंत्रमानव म्हणजेच रोबोटची संकल्पना कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानावरच आधारलेली आहे. काही वर्षांपूवी फेसबुक या सोशल मीडियाच्या क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीमध्ये वापरल्या जाणार्‍या दोन यंत्रमानवांमध्ये एक अनोखा प्रकार घडला. हे दोन यंत्रमानव एकमेकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत असताना त्यांनी एक नवी भाषा तयार करून त्यात संभाषण करण्याचा प्रयत्न सुरू केला. थोडक्यात, त्यांना भाषेसंदर्भात शिकवण्यात आलेल्या नियमावलींच्या बाहेरचे नियम त्यांनी स्वतःच घालून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्या नियमानुसार ते एकमेकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करू लागले.

या घटनेचे वृत्त प्रसारित झाल्यानंतर जगभरात खळबळ उडाली होती. त्यावेळी यंत्रमानव मानवावर वरचढ ठरणार, अशी भीती व्यक्त केली गेली. ‘टेस्ला’कार अ‍ॅलन मस्क याने अशा आशयाचे विधान केले होते. तत्पूर्वी जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग्ज यांनीही उद्याचे यंत्रमानव माणसाहूनही अधिक बुद्धिमान असतील, अशी भीती व्यक्त केली होती. शिकण्याची क्षमता असणारे संगणकीय सॉफ्टवेअर म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता असे म्हटले जात असले तरी या शिकण्यातून नव्याने उद्भवलेल्या परिस्थितीत माणसासारखेच निर्णय घेण्याची क्षमता संगणकामध्ये येऊ शकते. यंत्रमानवांना भावना नसतात. मग हा माणसापेक्षा हुशार झालेला भावनाविहीन यंत्रमानव भविष्यात काय करेल, याविषयी काहीच सांगता येत नाही. त्यामुळेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सविषयी जगभरात चिंतेचा सूर उमटत होता आणि आहे.

संबंधित बातम्या

तशातच ‘एआयचा गॉडफादर’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या डॉ. जेफ्री हिंटन यांनीही कृत्रिम बुद्धिमत्तेच्या धोक्यावर भाष्य करत ‘गुगल’मधून स्वतःहून पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. हिंटन आणि त्यांच्या दोन विद्यार्थ्यांनी एआय तंत्रज्ञानाला पायाभूत ठरेल, असे संशोधन केले आहे. मानवी मेंदूच्या संरचनेप्रमाणे अल्गोरिदमचे जाळे तयार करून संगणकाला ‘डीप लर्निर्ंग’साठी सक्षम बनवणार्‍या संशोधनाचे श्रेय हिंटन यांना जाते. चॅटजीपीटी तंत्रज्ञानाच्या निर्मितीत त्यांच्या संशोधनाचा मोठा वाटा आहे. दशकभरापूर्वी सुमारे 4.5 अब्ज डॉलर खर्चून गुगलने त्यांची कंपनी विकत घेतली होती. गुगलसाठी एआय तंत्रज्ञान विकसित करणे, हा हेतू अर्थातच त्यामागे होता. असे असताना या कामाबाबत खंत व्यक्त करून त्यांनी या तंत्रज्ञानाच्या संभाव्य धोक्यांकडे लक्ष वेधले आहे. न्यूयॉर्क टाईम्समध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे निर्माण होणार्‍या धोक्याचा इशारा देणार्‍या लेखात त्यांनी ‘एआय’ हे समाजविघातक व्यक्तींच्या हातचे खेळणे बनू शकेल, अशी भीती व्यक्त केली आहे. जगप्रसिद्ध अब्जाधीश वॉरेन बफेट यांनी बर्कशायर हॅथवेच्या यंदाच्या वार्षिक बैठकीतही ‘एआय’विषयी चिंता व्यक्त केली आहे. एआय सर्व प्रकारचे काम करू शकते. मात्र जेव्हा एखादे तंत्रज्ञान सर्व प्रकारच्या गोष्टी करू शकते तेव्हा मला काळजी वाटते. कारण या एआयवर नियंत्रण ठेवण्यात आपण अपयशी ठरणार आहोत. त्यामुळे एआय हा मानवाच्या अस्तित्वाला धोका असून अणुबॉम्बसारखा आहे, असे बफेट यांनी म्हटले आहे.

कृत्रिम बुद्धिमत्तेबाबत सुरुवातीच्या काळात भीती व्यक्त करत असताना काही ठरावीक प्रकारच्या नोकर्‍यांंवर किंवा अकुशल लोकांवर याचा प्रतिकूल परिणाम होईल, असे एक सर्वसामान्य मत होते. पण एआयचा धोका विशिष्टांना नसून सर्वांनाच आहे, हे आता जवळपास स्पष्ट झाले आहे. याबाबत सध्या जगभरात गाजत असलेल्या आणि चर्चेत असलेल्या चॅट जीपीटीचे उदाहरण पाहूया. यामध्ये अक्षरशः कुठलाही प्रश्न विचारल्यास त्या क्षेत्रातील तज्ज्ञ जसे उत्तर देईल, जवळपास तशाच प्रकारचे उत्तर मिळू शकते. म्हणजे समजा, एखाद्या डॉक्टरने रुग्णाची कोणतीही तपासणी न करता केवळ सांगितलेल्या लक्षणांवर आधारित काही मत व्यक्त केले, तर तशाच प्रकारचे मत चॅट जीपीटीमधून मिळू शकते. पूर्वी हे गुगलवर मिळत होते, हे खरे असले तरी चॅट जीपीटीमधून मिळणारे उत्तर असे असते की, जणू डॉक्टरच आपल्याशी बोलताहेत! ही बाब धोकादायक आहे.

काळानुसार या सॉफ्टवेअरमधील माहिती जितकी जास्त विश्वासार्ह होत जाईल, तितके लोकांचे त्यावर विश्वास ठेवण्याचे प्रमाणही वाढत जाईल. पण त्यावर खरोखरच विसंबून राहण्यासारखी परिस्थिती आहे का, हा प्रश्न उरतोच. कारण ठरावीक प्रसंगामध्ये डॉक्टरांचा अनुभव, रुग्णाच्या तपासणीतून आजाराचे निदान करण्याचे कौशल्य आणि उपचारांची दिशा ठरवण्याचे कसब या सर्वांचा त्यामध्ये अभाव असतो. असे असूनही त्याला मिळणारी लोकप्रियता आणि त्याबाबतची वाढती विश्वासार्हता ही धोक्याची असून ती डॉक्टरांच्या व्यवसायावर गदा आणणारी ठरू शकते. डॉक्टरांचे उदाहरण हे प्रातिनिधिक म्हणून नमूद केले आहे. सर्वच क्षेत्रात ही भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे अकुशल किंवा किंचित कौशल्य असणार्‍या लोकांपुरता एआयचा धोका मर्यादित राहिलेला नसून सगळ्याच प्रकारची कौशल्ये असणार्‍या सगळ्याच लोकांसाठी तो भस्मासुर बनू शकतो यात शंकाच नाही. त्यामुळे मोठमोठ्या कंपन्यांमध्ये कर्मचारी कपात येत्या काळात निश्चितच वाढणार आहे.

याबाबत एक गमतीचा भाग लक्षात घ्यायला हवा. चॅट जीपीटी, एआय या सर्वांची निर्मिती सॉफ्टवेअर क्षेत्रातील तज्ज्ञांनीच केली आहे; पण आता ती त्यांच्याही मुळावर उठते की काय, अशीही भीती निर्माण झाली आहे. याचे कारण समजा, चॅट जीपीटीला आपण विशिष्ट काम करून घेण्यासाठीचा प्रोग्राम जावा किंवा पायथन लँग्वेजमध्ये लिहून दे, असे सांगितले तर ते जसाच्या तसा प्रोग्राम बिनचूकपणे लिहून देते. असे झाल्यास प्रोग्रॅमर नावाच्या माणसाची गरज कितपत पडेल? मी स्वतः याचा अनुभव घेतलेला आहे. केवळ प्रोग्राम लिहून देण्यापर्यंतच नव्हे तर आपण त्यात सांगितलेले – सुचवलेले बदलही चॅट जीपीटी तितक्याच अचूकपणे करून देतो.

आणखी एक गोष्ट म्हणजे, चॅट जीपीटी असेल किंवा यंत्रमानव असतील, त्यामध्ये माहिती भरण्याचे काम माणसानेच केलेले आहे. त्यामुळे माणसाचे पूर्वग्रह यातूनही पुन्हा परावर्तित होतात. उदाहरणार्थ, अमेरिकेत कृष्णवर्णीयांना दिली जाणारी दुय्यम वागणूक किंवा भारतातील हिंदूंचे वाढते प्राबल्य. दूषित, कलूषित विचार एआयमधून जसेच्या तसे प्रकटणार आहेत. त्यामुळे रोजगाराच्या क्षेत्रात याचा वापर केला जाऊ लागल्यास आधीपासूनच घडणार्‍या अल्पसंख्याकांना नोकर्‍यांमधून वगळण्यासारख्या गोष्टी अधिक प्रमाणात घडू लागण्याची शक्यता आहे. ही शक्यता वास्तवात उतरल्यास संभाव्य धोका काल्पनिक न राहता प्रत्यक्षात येईल.

सर्वात मोठा धोका आहे तो आकलनक्षमतेवरील परिणामांचा. खास करून विद्यार्थ्यांच्या आकलनक्षमतेवर याचे प्रचंड दुष्परिणाम होताहेत. मी स्वतः अध्यापन करत असताना याचा अनुभव घेतलेला आहे. मुळातच सध्या शिकण्यातील रुची कमी होत चालली आहे. पण शालेय-महाविद्यालयीन शिक्षणातून शिकवले जाणारे सर्व काही चॅट जीपीटीवर उपलब्ध असताना आम्ही शिकायचे कशासाठी, असा प्रश्न विद्यार्थ्यांकडून उपस्थित केला जात आहे. विद्यार्थ्यांना एखादी असाईनमेंट दिल्यास तीही बिनचूकपणे चॅट जीपीटी सोडवून देऊ शकतो. विद्यार्थ्यांना त्या वयात पदवी घेऊन पुढे जायचे असल्याने यातील धोका लक्षात येत नाही. आधीच कोरोना काळापासून अभ्यास न करण्याची प्रवृत्ती मुलांमध्ये वाढीस लागली आहे. आता चॅट जीपीटीमुळे ती परमोच्च पातळीकडे सरकू लागली आहे. कारण शिक्षक शिकवतात ते सगळे काही चॅट जीपीटीवर आहे. त्यामुळे आपल्याला गरज भासेल तेव्हा आपण तेथून ते मिळवू. वास्तविक हा द़ृष्टिकोन पूर्णतः चुकीचा आहे. कारण ज्या चॅटजीपीटीवर विद्यार्थी असाईनमेंटपासून शिकण्यापर्यंत विसंबून राहात आहेत, त्यांना उद्याच्या भविष्यात नोकरी देणारे का कामावर घेतील? तेही चॅट जीपीटीकडूनच काम करून घेणार नाहीत का? पण ही बाब विद्यार्थ्यांच्या लक्षात येत नाही. त्यामुळे यातून मार्ग कसा काढता येईल आणि चॅट जीपीटीला जे शक्य होणार नाही, त्याचा शोध कसा घेता येईल याचा विचार केला गेला पाहिजे. हा विचार केवळ विद्यार्थ्यांनीच नव्हे तर संपूर्ण शिक्षण पद्धतीनेच करण्याची गरज आहे. यासाठी चॅट जीपीटीला सहजपणाने न जमू शकणारी विश्लेषणात्मक कौशल्ये कशी विकसित करता येतील हे पाहावे लागेल. अन्यथा, शिकण्याची गरजच काय, अशी भावना उद्याच्या पिढीमध्ये विकसित होत जाणे हे धोकादायक आहे. तंत्रज्ञानावरचे हे अवलंबित्व वैचारिक, बौद्धिक पंगुत्वाकडे नेणारे आहे.

जेफ्री हिंटन यांनी न्यूयॉर्क टाईम्समध्ये लिहिलेल्या लेखात आणखी एक धोका व्यक्त केला असून तोही असाच गंभीर आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यासारखी एखादी व्यक्ती एआय तंत्रज्ञानावर आधारित यंत्रमानव विकसित करून त्यांना त्यांच्या पद्धतीने एखादे विध्वंसक कृत्य तडीस नेण्याच्या आज्ञा देऊ शकते, असे हिंटन म्हणाले. अशी स्वैरसंचाराची मुभा मिळालेले यंत्रमानव स्वत:ला अधिक बलशाली बनवण्यासाठी स्वत:च काम करतील, असे हिंटन म्हणाले. ही भीती शतशः खरी आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारत शस्त्रास्त्रांनी दिलेल्या सूचनांचा अन्वयार्थ लावून विशिष्ट परिस्थितीत आपोआप काही कृती केल्यास त्यातून मोठा संहार घडण्याची भीती नाकारता येणार नाही.

सारांशाने सांगायचे झाल्यास, आधुनिक तंत्रज्ञानाच्या अल्लाउद्दीनचा दिवा घासून कृत्रिम बुद्धिमत्तेचा राक्षस आता बाहेर आलेला आहे. त्यामुळे सगळ्याच पातळ्यांवर आता नव्याने विचार करण्याची गरज आहे. उद्याच्या 10-15 वर्षांचा विचार करून मुलांना काय शिकवले पाहिजे, नेमक्या कोणत्या प्रकारच्या नोकर्‍या असू शकतील, कुठे चॅट जीपीटीचा प्रभाव असूनही रोजगारनिर्मिती करता येईल, अशा द़ृष्टीने तो विचार झाला पाहिजे. मूळ शिक्षणापासून त्याची सुरुवात झाली पाहिजे. अन्यथा ते पंगुत्व आणखी वाढत जाईल. कारण एकीकडे मुलांमध्ये शिकण्याची आवड कमी होत चाललेले असताना हे तंत्रज्ञान अधिक प्रभावी होत चालले आहे. याबाबत आधी पालकांमध्ये आणि मुलांमध्ये गांभीर्याने जागृती झाली पाहिजे.

एआयबाबत सिंग्युलॅरिटी अशी एक संकल्पना मांडली जाते. त्यानुसार एक क्षण असा येईल की, एआय हे मानवी बुद्धीपेक्षा जास्त श्रेष्ठ ठरेल किंवा मानवी विचारशक्तीसारखी क्षमता त्यामध्ये विकसित झाली तर तो क्षण खूपच धोकादायक असेल. कारण आज आपण विचारल्यानंतर विचारेल तेवढेच तो सांगतो. पण उद्या त्याचे तोच ठरवून निर्णय घेऊन मोकळा झाला तर ते महाभयंकर ठरेल. स्टीफन हॉकिंग्ज यांनी हा क्षण 2040 च्या दशकात येईल असे भाकीत वर्तवले होते. पण आजची एआयची प्रगती पाहता त्यापूर्वीच हे भाकीत खरे ठरेल की काय अशी एकंदर परिस्थिती आहे.

अतुल कहाते, आयटी तज्ज्ञ  

Back to top button