इंदापूर : पालखी मार्गाचे साहित्य चोरणारे जेरबंद | पुढारी

इंदापूर : पालखी मार्गाचे साहित्य चोरणारे जेरबंद

इंदापूर; पुढारी वृत्तसेवा : इंदापूर पोलिसांनी संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग कामावरील साहित्य चोरणार्‍या चोरट्यांना जेरबंद केले. यामध्ये चार संशयितांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 1 लाख 8 हजार रुपयांचा चोरीचा माल जप्त करण्यात आला आहे. इंदापूर पोलिस स्टेशन हद्दीतील वडापुरी (ता. इंदापूर) येथे संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग क्रमांक 965 या पालखी महामार्गावर चालू असलेल्या पुलाच्या कामाच्या लोखंडाचे कटिंग करण्याकरिता दोन जनरेटर सेटमधील दोन आर्मेचर, लोखंडी चॅनल व बार चोरीस गेल्याची तक्रार इंदापूर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली होती.

त्या अनुषंगाने पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी मार्गदर्शन करीत तपास पथक तयार केले होते. या तपास पथकास मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे इंदापूर पोलिस स्टेशन अंकित बावडा दूरक्षेत्र हद्दीतील काटी गावात चोरीस गेलेले दोन आर्मीचर असल्याची माहिती मिळाल्याने सहायक पोलिस निरीक्षक नागनाथ पाटील, महिला पोलिस हवालदार शुभांगी खंडागळे, पोलिस नाईक अमोल गायकवाड, विनोद लोखंडे, नंदू जाधव, विकास राखुंडे यांनी शोध घेतला असता विनोद विलास आरडे यांच्या घरी चोरीस गेलेले दोन आर्मिचर मिळाल्याने त्यास तपासकामी ताब्यात घेतले.

यामध्ये सहभागी असलेले इतर निलेश बाबासाहेब सरवदे, विठ्ठल हनुमंत भंडलकर आणि महेश विजय खिल्लारे (सर्व रा. काटी, ता. इंदापूर) यांना या गुन्ह्याच्या तपासकामी अटक करून त्यांच्याकडे सखोल तपास केला असता चोरीस गेलेल्या जनरेटर सेटचे दोन आर्मीचर, दोन मोटरसायकलचे सुट्टे भाग व इतर लोखंडी साहित्य असा एकूण 1 लाख 8 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Back to top button