Karnataka Election Results 2023 | कर्नाटकात काँग्रेसला ‘ऑपरेशन कमळ’ची धास्ती! सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरु, सर्व आमदारांना बंगळूरला बोलावले | पुढारी

Karnataka Election Results 2023 | कर्नाटकात काँग्रेसला 'ऑपरेशन कमळ'ची धास्ती! सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरु, सर्व आमदारांना बंगळूरला बोलावले

बंगळूर, पुढारी ऑनलाईन : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालात काँग्रेसने बहुमताची आघाडी आहे. सुरुवातीच्या कलानुसार काँग्रेसने ११3 जागांवर आघाडी घेतली आहे. तर भाजपने ७६ जागांवर आणि जेडीएसने ३० जागांवर आघाडी घेतली आहे. दरम्यान, काँग्रेसने सरकार स्थापनेच्या दिशेने हालचाली सुरु केल्या आहेत. काँग्रेसने त्यांच्या आमदारांना बंगळूरमध्ये आज येण्यास सांगितले आहे. आमदारांना बंगळूरला नेण्यासाठी राज्यातील दुर्गम भागातही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी निरीक्षकांचीही नियुक्ती करण्यात आल्याचे पक्षाच्या सूत्रांनी सांगितले. (Karnataka Election Results 2023) कर्नाटकात काँग्रेसला ‘ऑपरेशन कमळ’ची धास्ती असून त्यांनी त्यांचा आमदारांना बंगळूरला आणण्यासाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था केली असल्याचे समजते.

काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे पुत्र यतिंद्र सिद्धरामय्या यांनी काँग्रेसला पूर्ण बहुमत मिळवून स्वबळावर पक्ष सत्तेवर येईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. कर्नाटकच्या हितासाठी आपले वडील मुख्यमंत्री व्हायला हवेत, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. “भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आम्ही काहीही करू. राज्याच्या हिताच्या दृष्टीने माझ्या वडिलांनी मुख्यमंत्री व्हावे,” असे यतींद्र सिद्धरामय्या यांनी ANI वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.

दरम्यान, या निकालाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून प्रतिक्रिया आली आहे. “आम्ही प्रचंड बहुमताने सरकार स्थापन करू. यात काही शंका नाही. पंतप्रधानांच्या प्रचाराचा प्रभाव पडला नाही” असे काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनी म्हटले आहे. दरम्यान, काँग्रेसने बहुमताचा आकडा पार केल्याने बंगळूरसह राज्यातील अनेक भागांत काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरु केला आहे.

संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेणारी कर्नाटक विधानसभा निवडणूक आगामी वर्षी होणार्‍या लोकसभा निवडणुकीची रंगीत तालीम मानली जाते. इथे काँग्रेस जिंकली, तर केंद्रातही सत्तापालटाची आशा काँग्रेससह तिसर्‍या आघाडीला राहील. मात्र, भाजप जिंकला, तर पुढच्या वर्षीची लोकसभा निवडणूक तो पक्ष आणखी जोमाने लढवेल. कर्नाटकात सध्या भाजपची सत्ता आहे.

निवडणूकपूर्व चाचण्या आणि एक्झिट पोलमध्ये काँग्रेस हा १०० ते ११० जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरेल, असे भाकीत वर्तवण्यात आले आहे; तर काही एक्झिट पोलनी काँग्रेसला स्पष्ट बहुमत देऊ केले आहे. कुणाचे भाकीत खरे, हे आज दुपारपर्यंत स्पष्ट होईल. राज्यातील २२४ विधानसभा मतदारसंघांत २,६१५ उमेदवार रिंगणात आहेत. बेळगाव जिल्ह्यातील १८ मतदारसंघांत १८७ उमेदवार लढत आहेत. (Karnataka Election Results 2023)

हे ही वाचा :

Back to top button