साई रिसॉर्ट गैरव्यवहारप्रकरणी ‘ईडी’च्या आरोपपत्रात अनिल परबांचे नाव नाही | पुढारी

साई रिसॉर्ट गैरव्यवहारप्रकरणी 'ईडी'च्या आरोपपत्रात अनिल परबांचे नाव नाही

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्याशी संबंधित असलेल्या दापोलीतील साई रिसॉर्ट कथित गैरव्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) विशेष पीएलएमए सत्र न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रातून खुद्द परब यांचेच नाव वगळण्यात आले आहे. त्यामुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.

आरोपपत्रात परबांचे निकटवर्तीय व्यावसायिक सदानंद कदम आणि तत्कालीन प्रांताधिकारी जयराम देशपांडे यांच्यावर आरोप ठेवण्यात आले आहेत. वादग्रस्त ठरलेल्या साई रिसॉर्टसाठी जमिनीची खरेदी करण्यापासून ती नावावर करणे, करारपत्र बनवणे, रिसॉर्टच्या इमारतीचे बांधकाम आणि हस्तांतरापर्यंतच्या प्रक्रियेत नियम पायदळी तुडवत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार झाल्याचे आरोप आहेत. याप्रकरणी मनी लाँडरिंग कायद्यान्वये ईडी तपास करत असून ईडीने परब यांच्या मालमत्तांवर छापेमारी करून महत्त्वपूर्ण दस्तऐवज ताब्यात घेतले होते. तसेच, त्यांच्याकडे कसून चौकशी केली होती.

कदम आणि देशपांडे यांच्या अटकेनंतर ईडीने या प्रकरणात आरोपपत्र दाखल केले आहे. या दोघांसोबतच सुधीर शांताराम परदुले, विनोद दिपोलकर, सुरेश तुपे आणि अनंत कोळी यांच्या नावांचाही आरोपपत्रात समावेश आहे. मात्र, आरोपपत्रात परब यांच्या नावाचा समावेश नाही. त्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. ईडीने सावध पवित्रा घेत हे आरोपपत्र दाखल केल्याचे बोलले जाते. याप्रकरणाचा तपास ईडीकडून सुरू असून भविष्यात पुरवणी आरोपपत्र दाखल करण्याची ईडीला मुभा आहे.

Back to top button