Sachin Tendulkar Tadoba Visit : सचिनला लागलंय ताडोबाचं वेड! पाचव्यांदा कुटुंबासह दिली भेट | पुढारी

Sachin Tendulkar Tadoba Visit : सचिनला लागलंय ताडोबाचं वेड! पाचव्यांदा कुटुंबासह दिली भेट

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : ताडोबातील छोटी तारा, मोगली, मटका, माया, भानूसखिंडी (बिग फाईव्ह), युवराज असा एक नव्हे तर अनेक वाघ वाघिणींनी मास्टर ब्लॉस्टर सचिन तेंडूलकर यांना वेड लावलंय. त्यामुळेच दरवर्षी सचिन आपल्या कुटूंबियांसह ताडोबात येऊन सफारीचा आनंद घेतो. तब्बल पाचव्यांदा पुन्हा हजेरी लावली. चार दिवसांच्या मुक्कामानंतर आज, रविवारी (दि.७) सचिन सायंकाळी चिमूर जवळील एका रिसार्टवरून ताडोबाला बाय बाय करीत मंबईकडे रवाना झाला. मात्र चार दिवसाच्या सफारीत अनेकांचे ठिकाणांना सचिनने भेट दिली असली तरी भानूसखिंडीच्या दर्शनाची त्याची इच्छा मात्र अपूर्णच राहिली. (Sachin Tendulkar Tadoba Visit)

बुध्द पौर्णिमेच्या पूर्व संध्येला सचिन तेंडूलकर त्याच्या पत्नी अंजली व काही मित्रांसह ताडोबात चार दिवसांचे मुक्कामी दाखल झाला होता. त्यामुळे बुध्द पौर्णिमेच्या प्राणी गणनेचा साक्षीदार होण्याचा अपेक्षा सचिन होती. परंतु, त्यांनी फक्त सफारीचा निसर्गानुभाव घेतला. सचिनची ही ताडोबाला दिलेली पाचवी भेट आहे, अडीच महिण्यापूर्वीच फेब्रुवारी महिण्याच्या शेवटी तो ताडोबात येऊन गेला होता. त्यामुळे सचिनला ताडोबातील विविध नावांनी प्रसिद्ध असलेल्या अनेक वाघ वाघिणींना पाहण्याचे वेड लागले आहे असे म्हणावे लागेल. (Sachin Tendulkar Tadoba Visit)

गुरूवारी सायंकाळी चिमूर जवळील एका रिसार्टमध्ये त्याचे आगमन झाल्यानंतर आल्याआल्या त्यांने सायंकाळची कोलारा गेट मधून कोअरझोनमध्ये सफारी केली. या ठिकाणी छोटी तारा व एका अस्वलाचे दर्शन झाले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळी त्यांनी सहपरिवार कोलारा गेट मधूनच कोअरझोनमध्ये सफारी केली. यावेळीही पुन्हा छोटी तारा नावाची वाघीण आणि मटका नावाचा वाघ व अन्य प्राण्यांचे दर्शन झाले. त्यांनतर त्याच दिवशी अलिझंझा गेटमधून बफरझोनमध्ये सफारी केली. या ठिकाणी भानूसखिंड नावाच्या वाघीणीचे प्रस्थ आहे. तिला बिग फाईव्ह नावाने सुद्धा ओळखले जाते. त्यामुळे सचिनची तिला पाहण्याची इच्छा होती. परंतु, तिला न पाहता तिच्या 2 बछड्यांचे त्याला दर्शन घेता आले. तिचा एकूण चार बछडे आहेत. त्यामुळेच बिग फाईव्ह नावाने ओळखले जाते. ती समोर न आल्याने तिला पाहण्याचा योग आला नाही. (Sachin Tendulkar Tadoba Visit)

काल तिसऱ्या दिवशी शनिवारी सकाळी अलिझंझा गेट मधून बफरमध्ये सचिनने सफारी केली. यावेळी बबली नावाच्या वाघीणीने आपल्या दोन बछ्डयांसह दर्शन दिले. त्यांनतर भानूसखिंडीचे दर्शन होईल अशी अपेक्षा सचिनला होती, मात्र तिने पुन्हा सचिनला तिने पुन्हा हुलकावणी दिली.

आज शेवटच्या दिवशी सकाळी सचिनने कोलारा गेट मधून कोअरझोनमध्ये प्रवेश केला. यावेळी ताडोबातील युवराज नावाचा वाघ आणि पुन्हा छोटी ताराचे दर्शन झाले. त्यानंतर मुक्कामी रिसार्टमध्ये थांबले. यावेळी काही पत्रकांरांनी सचिनची भेट घेतली. यावेळी पत्रकांरानी त्यांना आपण वारंवार ताडोबा फॅमिलीसह येऊन सफारीचा आनंद घेता, असा प्रश्न केला, तेव्हा त्याने फक्त एन्जायमेंट एवढेच उत्तर दिले. परंतु त्यांच्या चेहऱ्यावरील हावभावावरून ताडोबातील विविध नावाने प्रसिध्दी असलेल्या रूबाबदार वाघ वाघिणींचे वेड लागलंय ऐवढे स्पष्ट दिसून आले. सर्वांशी संवाद साधल्यानंतर ताडोबा सफारी यशस्वी झाल्याचे सांगून बाय बाय करीत सचिनने ताडोबाचा निरोप घेतला. स्वत: नागपूर पर्यंत ड्रायव्हिंग करीत नागपूर मार्गे तो मंबईकडे रवाना झाला.

अधिक वाचा :

Back to top button