Wrestlers Protest : बृजभूषण सिंग यांना १५ दिवसांत अटक न केल्यास आंदोलन; खाप पंचायतीसह शेतकरी संघटनांचा सरकारला इशारा | पुढारी

Wrestlers Protest : बृजभूषण सिंग यांना १५ दिवसांत अटक न केल्यास आंदोलन; खाप पंचायतीसह शेतकरी संघटनांचा सरकारला इशारा

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : भारतीय कुस्ती संघटनेचे अध्यक्ष बृजभूषण सिंग यांना 15 दिवसांत अटक झाली नाही तर मोठे आंदोलन केले जाईल, असा इशारा खाप पंचायतीसहित शेतकरी संघटनांनी रविवारी केंद्र सरकारला दिला. सिंग यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करीत कुस्तीपटूंनी जंतर मंतरवर चालविलेल्या आंदोलनस्थळी आता खाप पंचायतींचे सदस्य आणि हरियाणा, पंजाबमधून आलेल्या शेतकऱ्यांनाही ठिय्या मांडला आहे.
शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्यासह इतर शेतकरी नेत्यांनी जंतर मंतरवर जाऊन कुस्तीपटूंना पाठिंबा दिला. कुस्तीपटूंनी आपले आंदोलन चालू ठेवावे, त्यांना आमचे पाठबळ राहील, असे टिकैत यांनी यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. आंदोलन चालविण्यासाठी खाप प्रतिनिधींवर जबाबदारी देण्याच्या मुद्द्यावरही चर्चा झाल्याचे सांगण्यात आले.
सिंग यांना अटक झाली नाही तर पुढील आंदोलनाची दिशा 21 मे रोजी निश्चित केली जाईल, असे सांगून टिकैत पुढे म्हणाले की, देशासाठी पदके आणणाऱ्या खेळाडूंचा अपमान सहन केला जाणार नाही. साक्षी मलिक, बजरंग पुनिया व इतर कुस्तीपटू 21 तारखेपर्यंत येथेच राहतील, सराव करतील आणि आंदोलनही करतील. ज्या खेळाडूंनी देशाचा गौरव वाढविला, त्यांना परक्यासारखी वागणूक दिली जात आहे.
भारतीय किसान संघटनेचे अध्यक्ष यांनीही जंतर मंतरवर येऊन कुस्तीपटूंना समर्थन जाहीर केले. पंजाबच्या किसान संघटनेचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने आंदोलनस्थळी जमले आहेत. यात महिलांचा सहभाग लक्षणीय आहे. 11 ते 18 मे या काळात मोदी सरकार आणि बृजभूषण यांची तिरडी जाळली जाईल, असे संघटनेचे अध्यक्ष जोगिंदर उगराहां यांनी सांगितले.

Back to top button