राज ठाकरेंना ‘मिमिक्री’शिवाय दुसरे जमते काय ? अजित पवार यांची टीका | पुढारी

राज ठाकरेंना 'मिमिक्री'शिवाय दुसरे जमते काय ? अजित पवार यांची टीका

बारामती : पुढारी वृत्तसेवा : विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी रविवारी (दि. ७) बारामतीत मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर तोफ डागली. राज ठाकरे यांना ‘मिमिक्री’शिवाय दुसरे काय जमते ? असा सवाल पवार यांनी केला. ‘मिमिक्री’ करणे हा राज ठाकरे यांचा जन्मसिद्ध हक्क आहे. परंतु जनतेने त्यांना नाकारले असल्याचे पवार म्हणाले. बारामतीत पत्रकारांशी ते बोलत होते. रत्नागिरीतील सभेत ठाकरे यांनी अजित पवार यांची मिमिक्री केली होती. त्यावर बोलताना पवार म्हणाले, त्यांना त्याशिवाय काय जमते.

पक्ष स्थापनेनंतर त्यांना सुरुवातीला राज्यात १४ जागा मिळाल्या. दुसऱया टर्मला जुन्नरला आमचाच सहकारी शरद सोनवणे याने त्यांचे तिकिट घेतल्याने त्यांची पाटी लागली. आता कल्याणचे सहकारी निवडून आले आहेत. त्यांच्याबरोबर पक्ष स्थापनेवेळी जे लोक होते त्यातील काही लोक सोडले तर बहुतांश लोक दूर गेलेले आहेत. त्यांना पक्ष वाढविण्याएेवजी अजित पवारची मिमिक्री करणे, माझे व्यंगचित्र काढणे यात समाधान वाटत असेल तर शुभेच्छा, या शब्दात पवार यांनी ठाकरे यांच्यावर टीका केली.

खासदार संजय राऊत यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशासंबंधी काहीही माहिती नसल्याचे पवार म्हणाले. राज्यातील सत्ता संघर्षासंबंधीच्या प्रश्नावर ते म्हणाले, शनिवारी बारामतीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी यासंबंधी सांगितले आहे. एकदा त्यांनी मत व्यक्त केल्यावर त्यावर आम्ही प्रतिक्रिया देत नाही. ती आमच्या पक्षाची भूमिका असते.

पवार यांच्या राजीनाम्याचा विषय आता संपला असून त्यावर चर्चा कऱण्याचे काही कारण नसल्याचे अजित पवार म्हणाले. महाविकास आघाडी कायम राहणार असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. मणीपूरमधील दंगलीसंबंधी पवार म्हणाले, बाॅक्सर मेरी कोम हिने सुद्धा या विषयावर केंद्र, राज्याने लक्ष घालावे अशी टीपण्णी केली आहे. कायदा, सुव्यवस्थेला बाधा आणणारांना दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश तेथे दिल्याचे माझ्या कानावर आले होते. राज्यातील विद्यार्थी तेथे अडकले आहेत. मी यासंबंधी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना पत्र दिले असून केंद्राशी, मणीपूरमधील वरिष्ठांशी बोलून विद्यार्थ्यांना सुरक्षित परत आणावे अशी मागणी केल्याचे पवार म्हणाले.

प्रेम कऱणारे संभ्रम निर्माण करतात
माझ्यावर मनापासून प्रेम कऱणारे, माझे काम ज्यांना बघवत नाही, असे जे काही लोक आहेत. ते माझ्याबद्दल संभ्रमाचे वातावरण निर्माण करत असल्याचा आरोप अजित पवार यांनी यावेळी केला.

पुन्हा तेच तेच का विचारता
ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा राजीनामा व त्यानंतरच्या पत्रकार परिषदेच्या अनुपस्थितीबद्दल पवार यांना विचारणा केली असता ते खवळले. मी कामाचा माणूस आहे. तुम्ही सकाळी उठलेले नसता. त्यावेळी मी कामाला लागलेलो असतो. त्यामुळे पुन्हा पुन्हा तेच तेच मुद्दे घेवून तुमचा आणि माझाही वेळ घेता असे पवार म्हणाले. पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर ती समिती नेमली त्यात २५ जणांचा समावेश होता. पत्रकार परिषदेला मोजकेच लोक उपस्थित राहावेत असे खासदार पवार यांनी सांगितले होते. त्यांचा आदेश शिरसावंद्य माणून मी तेथे नव्हतो. तुम्ही जसे माझ्या वाॅचवर आहात, तसे नाही. तुम्ही न घडलेले दाखवता. माझी कामे ठरलेली असतात. त्या दिवशी मी रात्री पुण्याला आलो असताना मी दिल्लीला गेल्याचे सागण्यात आले.

दुसऱ्या दिवशी पहाटे मी दौंडला जात बैठका उरकल्या. त्यानंतर कर्जतला गेलो. रात्री बारामतीत आलो. रविवारी दिवसभर कार्य़क्रम आहेत. ते संपल्यावर मुक्काम आहे. सोमवारी मी कोरेगाव, साताऱयात आले. साताऱयात सांयकाळी रयतची बैठक आहे. ९ मे रोजी रयतमधील कार्य़क्रमाला हजर राहणार आहे. त्यानंतर फलटणला रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाला उपस्थित राहणार आहे. १० तारखेला मी ऊस्मानाबाद, लातूरच्या, ११ तारखेला नाशिकच्या तर १२ तारखेला पुणे दौऱयावर असल्याचे सांगत पवार यांनी दौऱयाचा संपूर्ण तपशील पत्रकारांना सांगितला.

Back to top button