चक्क विद्यार्थ्यांनीच एकत्र येत टाकला निकालावर बहिष्कार ! | पुढारी

चक्क विद्यार्थ्यांनीच एकत्र येत टाकला निकालावर बहिष्कार !

वाळकी / चिचोंडी पाटील (नगर ) : पुढारी वृत्तसेवा : नगर तालुक्यातील सारोळा कासार येथील कर्मवीर भाऊराव पाटील कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्य संपत काळे यांची रयत शिक्षण संस्थेने तडकाफडकी जामखेडला बदली केल्याच्या निषेधार्थ ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांनी निदर्शने केली. निकालावरही बहिष्कार टाकला. प्राचार्य काळे यांनी शाळेच्या परिसरात मुलींच्या छेडछाडीला आळा घातला. लोकसहभागातून वर्षभरात तीनमजली नवीन इमारत पूर्ण करण्याचा प्रयत्न केला.

शाळेतील विद्यार्थ्यांना शिस्त लावली तशीच शिक्षक व इतर कर्मचार्‍यांना लावण्याचा प्रयत्न केला. परंतु काही शिक्षकांनी प्राचार्यांच्या विरोधात तक्रारी केल्या. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी प्राचार्य काळे यांची बदली करण्यात आली. शनिवारी (दि.6) सकाळी निकाल होता. मात्र एकाही विद्यार्थ्याने निकाल घेतला नाही. पालकांनीही निकाल न घेण्यावर ठाम भूमिका घेतली. सारोळा कासारसह घोसपुरी, अस्तगाव येथील ग्रामस्थांनी शाळेच्या आवारात आंदोलन केले.

प्राचार्य काळे यांची बदली रद्द करा, तक्रारदार शिक्षकांच्या बदल्या करा, अन्यथा शाळेचे कामकाज होऊ न देण्याची भूमिका आंदोलक ग्रामस्थांनी घेतली. सुमारे तीन तास शाळेत आंदोलन सुरू होते. रयतच्या उत्तर विभागाचे विभागीय अधिकारी तुकाराम कन्हेरकर, सहायक विभागीय अधिकारी वाळुंजकर यांनी शाळेत येत आंदोलक ग्रामस्थांशी चर्चा केली. तसेच बदली रद्द करण्यासाठी 10 मेपर्यंत मुदत मागितली. यावेळी बदली रद्द झाल्यावरच आम्ही निकाल घेऊ, अशी भूमिका विद्यार्थ्यांनी मांडली.

Back to top button