फ्लेचर पटेल, ‘लेडी डॉन’शी समीर वानखेडे यांचा काय सबंध ?’ | पुढारी

फ्लेचर पटेल, ‘लेडी डॉन’शी समीर वानखेडे यांचा काय सबंध ?’

मुंबई : पुढारी ऑनलाईन

 

‘एनसीबी’ने टाकलेल्या छाप्यांमध्ये फ्लेचर पटेल नावाची व्यक्ती पंच आहे.  त्याचा आणि एनसीबीचे विभागीय अधिकारी समीर वानखेडे यांचा संबंध काय ? त्याच्यासोबत असलेल्या फोटोमध्ये लेडी डॉन कोण? असा सवाल मंत्री नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषदेत केला.

या वेळी नबाब मलिक म्हणाले, ‘माझ्‍या जावायावर वानखेडे यांनी कारवाई केली म्‍हणून मी एनसीबीच्‍या कारवाईवर प्रश्‍न उपस्थित करत आहे, असा आरोप विरोधक करत आहेत. मी पहिली पत्रकार परिषद घेतली तेव्हाही असेच प्रश्न उपस्थित केले, मात्र, आता हा प्रश्न किती गंभीर आहे, हे नागरिकांना कळत आहे.

मनीष भानुषाली, गोसावी यांच्याबाबत मी प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर ते गायब झाले. फ्लेचर पटेल ही व्यक्ती रिया चक्रवर्ती प्रकरणातही पंच होती. या व्यक्तीसोबत समीर वानखेडे यांचे फोटो आहेत. ही व्यक्ती कोण यांचा शोध आता माध्यमांनी घ्यावा. शिवाय फ्लेचर पटेलने एका महिलेसोबत फोटो टाकून तिला लेडी डॉन म्हटले आहे. ती लेडी डॉन कोण आहे? याचे उत्तरही समीर वानखेडे यांनी द्यावे, असे आव्‍हानही मलिक यांनी दिली.

फ्लेचर पटेल कोण आहे?

नबाब मलिक यांनी शनिवारी सकाळी टि्‌वटची मालिका टाकणार असे जाहीर केले होते, त्यानुसार सकाळी ट्विट करून फ्लेचर पटेल कोण? असे म्हणत एकामागोमाग एक ट्विट केले. त्यानंतर पत्रकार परिषद घेतली. तसेच समीर वानखेडे यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मलिक यांनी फ्लेचर पटेल याचे काही फोटो शेअर करत ‘एनसीबी’च्‍या कार्यपद्‍धतीवर प्रश्न उपस्थित केले.

फ्लेचर पटेल कोण आहेत? फ्लेचर पटेल आणि एनसीबीचा काय संबंध आहे? फ्लेचर पटेल यांचा समीर वानखेडे सोबत फोटो कसे काय?  एकच व्यक्ती एनसीबीच्या अनेक कारवायांमध्ये पंच कसा ? छापेमारीच्या कारवायांमध्ये कौटुंबीक मित्रालाच पंच कसे केले?  एकच व्यक्ती एनसीबीच्या अनेक कारवायांमध्ये पंच कसा काय? असे प्रश्न मलिक यांनी उपस्थित केले आहेत. फ्लेचर पटेल ही व्यक्ती सैन्यदलातून निवृत्त आहे. त्याचा माजी सैनिक संघटनेशी संबंध आहे. सोशल मीडिया अकाउंटवरील फोटोनुसार ही व्यक्ती सैन्यदलात जाऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींना मार्गदर्शन करते असे दिसते. मात्र, मलिक यांनी पटेल आणि वानखेडे याचे संबंध काय? याबाबत स्पष्टीकरण दिलेले नाही.

लेडी डॉन कोण ?

फ्लेचर पटेल याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एका महिलेसोबतचा फोटो दाखवून त्याखाली लिहिलेली कॅप्शनही प्रसिद्ध केली आहे. ही लेडी डॉन कोण, असा सवाल उपस्थित करत या महिलेच्या माध्यमातून बॉलीवूडमधील कारवाया सुरू आहेत, असा गंभीर आरोप केला. एनसीबीने  क्रूझवरील ड्रग्ज कारवाई  पंचनामे ठरवून केले आहेत. एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे आणि फ्लेचर पटेल यांचा काय संबंध आहे. लेडी डॉनच्या मदतीने फिल्म इंडस्ट्रीमध्ये काय सुरु आहे? याचे समीर वानखेडे याचं उत्तर द्यावे, असेही मलिक म्‍हणाले.

हेही वाचा : 

Back to top button