11 मे नंतर महाराष्ट्रात नवं सरकार येणार? कायदे तज्ज्ञाचा मोठा दावा | पुढारी

11 मे नंतर महाराष्ट्रात नवं सरकार येणार? कायदे तज्ज्ञाचा मोठा दावा

पुढारी ऑनलाईन: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्ष पदावरून निवृत्त होण्याची घोषणा केली आहे. यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय घडणार याबाबत राजकीय विश्लेषक अनेक अंदाज वर्तवत आहेत. हे सर्व घडत असतानाच कायदेतज्ञ असीम सरोदे यांनी केलेल्या एका ट्विटने पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे.

कायदेतज्ञ असीम सरोदे यांनी आपल्या ट्विटमध्ये एक मोठा दावा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, कार्याध्यक्ष, पदाधिकारी हे 10 मेच्या आधी नक्की होतील, असा दावा त्यांनी केला आहे. या बरोबरच राज्यात नवीन सरकार स्थापनेबाबतही त्यांनी मोठा दावा केला आहे. 11 मे नंतर नवीन सरकार स्थापनेच्या घडामोडींना वेग येणार हे सुद्धा नक्की, असं असीम सरोदे आपल्या ट्विटमध्ये पुढे म्हटलं आहे.

खासदार शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ माजली आहे. पवारांच्या या निर्णयाचे पडसाद महाविकास आघाडीतही उमटले आहेत. या दरम्यान काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटातला सुसंवाद चांगलाच वाढला आहे.

दुसरीकडे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनीही एक मोठा गौप्यस्फोट केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचं भाजपसोबत बोलणं सुरू आहे असं त्यांनी म्हटलं होत. यानंतर आता असीम सरोदे यांच्या या ट्विटनेही लक्ष वेधलं आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय घडतं? हे पाहणं फार महत्त्वाचं ठरणार आहे.

Back to top button