पुणे पालिकेचा ’आपला दवाखाना’ कागदावरच ! 1 मे उलटला, तरी जागेची चाचपणीच सुरू | पुढारी

पुणे पालिकेचा ’आपला दवाखाना’ कागदावरच ! 1 मे उलटला, तरी जागेची चाचपणीच सुरू

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  राज्यात सर्वत्र 1 मे रोजी ‘आपला दवाखाना’ सुरू करण्यास शासनाकडून सांगण्यात आले. परंतु, पुणे महापालिकेचा ‘आपला दवाखाना’ अद्याप तरी कागदावरच आहे. कारण, त्यासाठी वाघोलीत लागणार्‍या जागेची अद्यापही चाचपणीच सुरू आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा करून आपला दवाखान्याची निर्मिती करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार पुण्यात देखील आपला दवाखाना 1 मे रोजी सुरू होणे अपेक्षित होते. ग्रामीण भागातील दहा दवाखान्यांची उद्घाटने झाली, परंतु, पुणे महापालिकेला अद्याप दवाखाने उभारणे जमले नसल्याची माहिती पुढे आली आहे.

वाघोलीमध्ये आपला दवाखाना सुरू करण्याबाबत चाचपणी सुरू होती, परंतु, काही कारणांनी जागा निश्चित न झाल्याने आपला दवाखाना इतरत्र न होता तो केवळ 1 मे रोजी कागदावरच राहिला. शहरी भागातील गरीब रुग्णांसाठी आपला दवाखानामार्फत सुविधा पुरविण्यात येणार आहे. आपला दवाखान्याच्या माध्यमातून बाह्य रुग्ण सेवा, मोफत औषधोपचार, मोफत तपासणी, डेली कन्सल्टेशन, महिन्यातून निश्चित दिवशी नेत्र तपासणी, एक्स-रे साठी संदर्भसेवा, गर्भवती मातांची तपासणी आणि लसीकरण या सुविधा देण्यात येणार आहे. सोनोग्राफी व पॅनलवरील डायग्नोस्टिक केंद्राद्वारे स्वस्त दरात वैद्यकीय सेवा देण्यात येणार आहे. तसेच बाह्य यंत्रणेद्वारे रक्त तपासणीची सोय मानसिक आरोग्यासाठी समुपदेशन सेवा, आवश्यकतेनुसार विशेषता संदर्भ सेवा, योगा व व्यायामबाबतचे प्रात्यक्षिक देखील देण्यात येणार आहेत.

ग्रामीण भागात शक्य, शहरात का नाही?
जिल्ह्यातील जुन्नर, शिरूर, तळेगाव, सासवड, दौंड, भोर, बारामती, इंदापूर, राजगुरुनगर आणि पुणे कॅन्टोन्मेंट भागात आपला दवाखान्याची उद्घाटने आमदार, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या उपस्थितीत झाली. मात्र, शहरात महापालिकेला दवाखाना सुरू करणे का शक्य झाले नाही? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Back to top button