2019 ला भाजपशी युतीसाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांचा संवाद झाला होता : शरद पवार | पुढारी

2019 ला भाजपशी युतीसाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांचा संवाद झाला होता : शरद पवार

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : 2019 मध्ये भाजप आणि शिवसेना यांच्यात सत्तास्थापनेवरून संघर्ष सुरू होता तेव्हा भाजपशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही निवडक नेत्यांचा एकत्र सत्ता स्थापन करण्यासाठी अनौपचारिक संवाद झाला होता. मात्र, आपण त्या प्रक्रियेत सामील नव्हतो, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे.

शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या राजकीय आत्मकथेची सुधारित आवृत्ती मंगळवारी प्रकाशित करण्यात आली. त्यात शरद पवार यांनी अनेक गुपिते उघड केली आहेत. 2019 मध्ये भाजप – शिवसेनेने एकत्र निवडणुका लढल्यानंतरही मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावर ही युती तुटली होती. त्यावेळी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी कशा हालचाली सुरू होत्या, याची माहिती शरद पवारांनी दिली आहे.

शिवसेनेचे बिनसल्यानंतर आमच्यासोबत सरकार स्थापन करता येईल का, याची चाचणी भाजपने केली होती. परंतु, त्या प्रक्रियेत मी नव्हतो. तशी फक्त भाजपची इच्छा होती. आमच्यात अनौपचारिक चर्चा काही झाली नव्हती. मात्र, दोन्ही पक्षांच्या निवडक नेत्यांमध्ये अनौपचारिक पातळीवर संवाद झाला होता, असे शरद पवार यांनी सांगितले आहे.

आम्हाला फारसे स्वारस्य नसल्याने आपसात चर्चा झाल्यावर भाजपसोबत जायचं नाही, असा निर्णय झाला. ही गोष्ट भाजपच्या सर्वोच्च नेतृत्वाला भेटून स्पष्ट करावी, यासाठी मी नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती, असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. त्याचवेळी मोदींना भेटून मी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यात राजकीय सख्य होऊ शकत नाही, असे स्पष्टपणे सांगून आलो. मात्र, हे सांगत असतानाच एक गोष्ट नमूद करायला हवी की, भाजपबरोबर जुळवून घ्यावं अशी इच्छा असणारे काही नेते राष्ट्रवादीतही होते. वाजपेयी सरकारच्या काळापासूनच त्यांना तसं वाटत होतं, असेही पवार यांनी आपल्या आत्मकथेत नमूद केले आहे.

पृथ्वीराज चव्हाण यांच्यामुळे आघाडीला घरघर

शरद पवार यांनी राज्यात संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार जाण्यास तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनाही जबाबदार धरले आहे. ते राज्यात आल्यानंतर आघाडीला घरघर लागल्याची टिप्पणी त्यांनी केली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतलेल्या भूमिकेची आम्हाला चिंता होती. त्यापूर्वी महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची पंधरा वर्षे आघाडी होती. सरकारचा कारभार उत्तम आणि समन्वयाने चालला होता. तो तसा चालण्याचे श्रेय विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे आणि अशोक चव्हाण यांना होते. त्यांनी समजूतदार भूमिका घेतली. त्यामुळे फारसा खडखडाट न होता, तीव्र मतभेद न होता सरकार चालले.

पृथ्वीराज चव्हाण राज्यात आल्यानंतर परिस्थिती बदलली. त्यांची स्वच्छ प्रतिमा ही जमेची बाजू होती. परंतु, ते सर्वांना बरोबर घेऊन कारभार करतील का, याबाबत आमच्या मनात शंका होत्या. त्यामागे पृथ्वीराज चव्हाण यांची पार्श्वभूमी होती. पृथ्वीराज चव्हाण यांचे वडील आनंदराव आणि आई प्रमिलाताई यांचे काँग्रेसमधले स्थान मोठे होते. परंतु, त्यांचा सांधा यशवंतराव चव्हाण साहेब यांना मानणार्‍यांशी फारसा कधी जुळला नव्हता. विशेषतः चव्हाण साहेबांशी सहमती नसलेल्या लोकांशी त्यांच्या घरोबा अधिक होता. चव्हाण साहेबांचे आणि माझे संवादाचे नाते सर्वश्रुत आहे. त्याच्या परिणामी माझ्यासमवेतही पृथ्वीराज चव्हाण कुटुंब यांचे सूर फारसे कधी जुळलेले नव्हते. प्रत्यक्ष कोणता वाद व संघर्ष नसला तरी परस्पर मनमोकळा संवाद कधीच झाला नव्हता.

दिल्लीतल्या काँग्रेस श्रेष्ठींच्या कलेने चालणारे अशीच पृथ्वीराज चव्हाण कुटुंबांची ओळख होती. त्यांची काँग्रेस श्रेष्ठी समवेत असलेली जवळीक राज्याच्या राजकारणात अडचणी निर्माण करू शकेल, अशी आम्हाला सादर भीती होती. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झाल्यानंतर आम्हाला वाटणारी भीती प्रत्यक्षात उतरली. राष्ट्रवादी काँग्रेस आपला घटक आणि मित्रपक्ष या भूमिकेत थोडे अंतर पडायला सुरुवात झाली, असे शरद पवार यांनी नमूद केले आहे. सिंचनप्रकरणी विरोधकांनी अजित पवार यांच्याविरुद्ध आरोपाची राळ उठवली तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस हेच आपले पहिले लक्ष्य असल्याचे मानून पृथ्वीराज चव्हाण यांची वागणूक उभय पक्षांच्या संबंधात ताण निर्माण करणारी ठरली, असा आरोप शरद पवारांनी या पुस्तकात केला आहे.

माझे नाव वापरून अजितने आमदारांना राजभवनावर नेले!

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा यशस्वी होऊ घातलेला पट उधळून लावण्यासाठी केंद्र सरकार, राजभवन आणि भाजपने खेळलेला रडीचा डाव होता. त्यावेळी राष्ट्रवादीतील आमदारांना माझे नाव वापरून राजभवनात नेले गेले. त्यावेळी पहाटेच्या शपथविधीचे अजितने उचललेले पाऊल अत्यंत गैर होते, असा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या राजकीय आत्मकथेतून केला आहे. तसेच त्यांच्या या निर्णयाला माझ्यासह राष्ट्रवादीचा अजिबात पाठिंबा नव्हता, असेही शरद पवारांनी म्हटले आहे.

शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या राजकीय आत्मचरित्राच्या सुधारित आवृत्तीचे मंगळवारी प्रकाशन झाले. यात आत्मकथेत पवारांनी 2015 नंतरच्या अनेक घटनांची गुपिते उघड करताना महाविकास आघाडीची जुळणी या प्रकरणात भाष्य केले आहे.

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या राजभवनातील पहाटेच्या शपथविधीबाबत खुलासा करताना म्हटले की, महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला एकत्र करण्याचे आणि महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्याचे प्रयत्न सुरू होते. आघाडीचा सरकार स्थापन करण्याचा मार्ग प्रशस्त झाला असतानाच एक अभूतपूर्व वळण महाराष्ट्राच्या राजकारणात आले. 23 नोव्हेंबर 2019 च्या सकाळी साडेसहा वाजता माझ्या निवासस्थानी फोन खणखणला. राष्ट्रवादीचे काही आमदार राजभवनात पोहोचले असून, अजित पवार यांनी भाजपला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा असल्याचे पत्र दिले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर अजित पवार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत, अशी माहिती मला देण्यात आली. तो माझ्यासाठी मोठा धक्का होता.

महाविकास आघाडीचे सरकार बनवण्यासाठी राष्ट्रवादीचा पुढाकार असतानाच हे घडणे म्हणजे आमच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह होते. मी थोडी माहिती घेतल्यावर लक्षात आले की जेमतेम दहाच आमदार अजितबरोबर गेले आहेत. त्यांच्यापैकी एक-दोघांशी बोलल्यावर लक्षात आले की, हे माझ्या संमतीनेच घडत असल्याची त्यांना सांगितले गेले आहे. त्यानंतर मी काही मिनिटातच सावरलो, घडलेले धक्कादायक होते. परंतु, दिशाभूल करून घडवण्यात आले होते.

कारण महाविकास आघाडीचा पट उधळून लावण्यासाठी भाजपकडून हा रडीचा डाव खेळला गेला होता. माझ्या नावाचा वापर करून राष्ट्रवादीच्या आमदारांची दिशाभूल केली होती. तसेच अजित पवार यांची ही कृती गैर होती, शरद पवार यांनी अजित पवार यांना खडे बोल सुनावले आहेत.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून कमी पडले! त्यामुळे शिवसेना फुटली

उद्धव ठाकरे यांच्याबाबतही शरद पवार यांनी पुस्तकात टिप्पणी केली आहे. काही मुद्द्यांवर त्यांच्यावर स्तुतीसुमने उधळतानाच त्यांच्या मंत्रालयात न जाण्याबाबत नाराजीही मिळविली आहे. मुख्यमंत्री झाल्यावरही उद्धव ठाकरेंनी पँट-शर्टमध्ये वावरणे हे एक अप्रूप होते. कोरोना काळात त्यांनी फेसबुकद्वारे साधलेला संवाद जनतेला फारच भावला होता. सामान्य मुंबईकरांत व सरकारी कर्मचार्‍यांत ठाकरेंबाबत आपुलकी होती. ठाकरेंना काही शारीरिक समस्यांमुळे अडचणी आल्या तरी मंत्रालयात दोनदा जाणे आमच्या पचनी पडणारे नव्हते. आघाडीसाठी मी पुढाकार घेतल्याने त्याचे जनकत्व व पालकत्व माझ्याकडे होते. या नात्याने मी त्यांच्याशी बोलायचो. त्याची कार्यवाही ते करायचे; पण राज्याचे प्रमुख म्हणून ते कमी पडले. राज्याच्या प्रमुखाला सर्व बित्तंबातमी हवी. त्याचे यावर बारीक लक्ष हवे; पण अनुभव नसल्याने त्याची कमतरता जाणवली. त्यामुळे शिवसेनेतील फूट टाळण्यात ते कमी पडले, असे भाष्य पवारांनी केले आहे.

Back to top button