कोल्हापुरात 141 कि.मी. रस्त्याच्या पॅचवर्कसाठी 71 कोटींची मागणी | पुढारी

कोल्हापुरात 141 कि.मी. रस्त्याच्या पॅचवर्कसाठी 71 कोटींची मागणी

कोल्हापूर, सतीश सरीकर : कोल्हापूर शहराची खड्ड्यातून सुटका करण्यासाठी नव्या रस्त्यांच्या बांधणीबरोबरच पॅचवर्क करणे आवश्यक आहे. महापालिकेच्या सर्वेक्षणातून तब्बल 141 किलोमीटर लांबीचे रस्ते खड्डेमय असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानुसार 51 रस्त्यांची अवस्था दयनीय बनली आहे. या रस्त्यांच्या अस्तरीकरणाबरोबरच पॅचवर्कसाठी 71 कोटी रुपये लागणार आहेत. प्रशासनाने त्यासंदर्भात प्रस्ताव तयार करून राज्य शासनाला पाठविला आहे. लवकरच शासनाकडून त्यासाठी निधी मिळण्याची शक्यता आहे.

काही वर्षांपूर्वी अमृत योजनेंतर्गत कोल्हापूर शहरासाठी 115 कोटींचा निधी मिळाला. त्यातून शहरात जलवाहिन्या आणि ड्रेनेजलाईन टाकण्यात येणार होत्या. परंतु ते काम अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यासाठी खोदाई केलेले रस्ते अद्यापही तसेच आहेत. 2019 व 2021 च्या महापुरात कोल्हापुरातील बहुतांश भागाला पुराच्या पाण्याचा वेढा पडला होता. त्यात शहरातील अनेक रस्ते खराब झाले.

महापालिकेची आर्थिक स्थिती नसल्याने डांबरीकरणासाठी निधी नव्हता. परिणामी महापालिकेने शासनाला निधीसाठी प्रस्ताव पाठवला होता. त्यात शहरातील प्रमुख रस्त्यांचा समावेश आहे. इतर रस्त्यांसह उपनगरातील रस्त्यांच्या पॅचवर्कसाठी महापालिकेच्या तिजोरीत ठणठणाट आहे. त्यामुळे महापालिकेने त्या रस्त्यांचे सर्वेक्षण करून आराखडा तयार केला आहे. त्यानुसार शासनाला निधीसाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.

कोल्हापूर शहर 66.82 किलोमीटर (क्षेत्रफळ) विस्तारले आहे. तब्बल एक हजार किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत. यात आयआरबीने केलेले रस्ते 49.99 कि.मी., नगरोत्थान योजनेतील रस्ते 39 कि.मी., लिंक रोडमधून झालेले 16 कि.मी. रस्त्यांचा समावेश आहे. इतर रस्ते आमदार, खासदार निधीबरोबरच महापालिका निधी व नगरसेवकांच्या ऐच्छिक निधीतून तयार करण्यात आले आहेत. परंतु त्यातील अनेक रस्ते सद्य:स्थितीत फक्त नावालाच उरले आहेत. परिणामी वाहनचालकांचे कंबरडे मोडत आहे.

100 कोटींतून पहिल्यांदा सिमेंट-काँक्रिटची कामे

कोल्हापूर शहरातील रस्ते अत्यंत खराब झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेने यापूर्वी 100 कोटींचा प्रस्ताव राज्य शासनाला पाठविला होता. त्यांतर्गत शहरातील प्रमुख 16 रस्त्यांच्या बांधणीसाठी निधी मिळाला आहे. परंतु आता पावसाळा तोंडावर आला असल्याने डांबरीकरण करणे अडचणीचे ठरणार आहे. आतापासूनच आंदोलकांचे पेव फुटले आहे. त्यामुळे सद्य:स्थितीत महापालिकेला फक्त निविदा प्रक्रिया राबवावी लागणार आहे. पावसामुळे याच निधीतून होणारी सिमेंट-काँक्रिटची कामे पहिल्यांदा करण्याचा प्रयत्न महापालिकेचा राहील. त्यामुळे 100 कोटींच्या निधीतून कामाला लवकरच सुरुवात होईल. परिणामी खड्ड्यातून काहीअंशी कोल्हापूरकरांची सुटका होण्यास मदत होईल.

Back to top button