बेळगाव : नशेबाज महिलेकडून युवकाचा खून | पुढारी

बेळगाव : नशेबाज महिलेकडून युवकाचा खून

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा :  नशेत तर्रर्र असलेल्या महिलेने दुचाकीवरून निघालेल्या दोघा तरुणांना रस्त्यात अडवले अन् मोबाईल मागण्याचे निमित्त करून दुचाकीवरील तरुणाचा भोसकून खून केला. एकच घाव पण वर्मी लागल्याने तरुणाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास जुन्या पीबी रोडवरील कीर्ती हॉटेलजवळ ही घटना घडली. नागराज भीमशी रागीपाटील (वय 28, रा. तारीहाळ, ता. बेळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. जयश्री पवन वेसणेकर (वय 35, मूळ रा. दांडेली, सध्या रा. एपीएमसी कंग्राळी) या महिलेला अटक केली. तिच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून न्यायालयासमोर उभे केले असता हिंडलगा कारागृहात रवानगी केली.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जयश्री हिचा पती वारलेला असून मुले परगावी शिकतात. तिला दारूचे व्यसन असून रविवारी ती भरपूर प्यायली होती. सीबीटीकडून आरटीओ सर्कलमार्गे दोघे तरुण दुचाकीवरून चालले होते. नागेंद्र कुकडोळी हा दुचाकी चालवत होता तर नागराज पाठीमागे बसला होता. कीर्ती हॉटेलजवळ जयश्री अचानक त्यांच्या दुचाकीसमोर आली व दोघांना अडवले. माझा मोबाईल दे, असे ती म्हणू लागली. चालक नागेंद्रने आमच्याकडे कुठला तुझा मोबाईल अशी विचारणा केली, तरीही ती या दोघांची दुचाकी सोडत नव्हती. त्यामुळे पाठीमागे बसलेला नागराज काहीसा चिडला व त्याने तुझा मोबाईल तुला माहिती आमच्याकडे नाही असे म्हटले. चिडलेल्या जयश्रीने साडीत लपवलेला चाकू काढला अन् नागराजच्या छातीवर वार केला. हा घाव वर्मी बसल्याने मोठा रक्तस्त्राव झाला. त्याला तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल केले. परंतु, उपचाराचा उपयोग न होता बाराच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.  मार्केट पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सदर महिलेला ताब्यात घेतले. तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर रात्री उशिरा तिच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला. पोलिस निरीक्षक पॉल प्रियकुमार तपास करीत आहेत.

पतीच्या निधनानंतर अस्वस्थ

जयश्रीच्या पतीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले आहे. तेव्हापासून ती मानसिक अस्वस्थ असून अशी दारू पित फिरत असल्याचे सांगण्यात येते. कधी ती एपीएमसी परिसरात तर कधी बेळगावात अशीच फिरत असते. रविवारी तिने जादा मद्यप्राशन केले अन् नशेत एकाचा खून केला. तिला मुले असून ती विजापूर येथे शिकायला असल्याचे सांगण्यात येते.

यात्रेसाठी आला अन् बळी गेला

नागराज हा मूळचा तारीहाळ येथील असला तरी तो गवंडीकामानिमित्त सातारा जिल्ह्यातील कराड येथे असतो. श्री रामेश्वरी यात्रा असल्याने तो गावी आला होता. सायंकाळी तो बेळगावात नवीन कपडे व चप्पल खरेदीसाठी मित्रासोबत आला होता. खरेदीनंतर रात्री ते दोघेही गावी निघाले होते. यावेळी काहीही संबंध नसलेली ही महिला रस्त्यात भेटली तिने भोसकले अन् नागराज या तरुणाचा हकनाक बळी गेला.

आधी लग्नमंडपात धिंगाणा

जयश्री रविवारी रात्री 9.30 च्या सुमारास दारू पिऊन बारबाहेर पडली. ढोर गल्लीत हळदी समारंभ सुरू होता. येथे घुसून लग्न मंडपात तिने चाकू दाखवत धिंगाणा घातला. यानंतर ती जेव्हा मुख्य रस्त्यावर आली तेव्हा तिने नागराजला भोसकले.

Back to top button