WEF Report 2023 | पुढच्या ५ वर्षांत जागतिक ‘रोजगार’ मार्केट संकटात; भारतात मात्र दिलासादायक स्थिती-WEF रिपोर्टमधील माहिती | पुढारी

WEF Report 2023 | पुढच्या ५ वर्षांत जागतिक 'रोजगार' मार्केट संकटात; भारतात मात्र दिलासादायक स्थिती-WEF रिपोर्टमधील माहिती

पुढारी ऑनलाईन : पुढील पाच वर्ष जागतिक रोजगार मार्केटवर संकटांचे सावट असणार आहे. जागतिक रोजगार मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात उलथापालथ होणार आहे. जवळपास २५ टक्के रोजगारांमध्ये मोठा बदलणार होणार आहे, असे असले तरी भारतीय रोजगार मार्केटसाठी मात्र कोणताही अधिक बदल होणार नसून, दिलासादायक स्थिती असणार आहे. असे नुकत्याच जाहीर झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या (WEF Report 2023) अहवालात नमूद करण्यात आले आहे.

WEF द्वारे नुकताच जागतिक रोजगार मार्केटवर आधारित “फ्यूचर ऑफ जॉब्स” हा अहवाल आज (दि.१ मे) प्रसिद्ध करण्यात आला आहे. जागतिक रोजगार मार्केटच्या तुलनेत भारतीय रोजगार मार्केटमध्ये पुढील पाच वर्षांत सरासरीपेक्षा कमी अस्थिरता दिसून येणार आहे. भारतीय रोजगार मार्केटमध्ये पुढील पाच वर्षांत २२ टक्के उलथापालथ म्हणजे बदल होणार आहेत. जे जागतिक रोजगार मार्केटच्या २३ टक्क्यांच्या तुलनेत काही प्रमाणात कमी असेल, असे या अहवालातून स्पष्ट करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय समूहाचा हा अहवाल जगातील २७ उद्योग समूह आणि ४५ आर्थिक क्षेत्रांतील ८०० कंपन्यांच्या सर्वेक्षणाच्या आधारे (WEF Report 2023) तयार करण्यात आला आहे.

WEF Report 2023: २०२७ पर्यंत ६.९० कोटी नवीन नोकऱ्या

WEF च्या अहवालानुसार, २०२७ पर्यंत ६९ दशलक्ष म्हणजेच ६.९० कोटी नवीन नोकऱ्या निर्माण होतील. तर ८३ दशलक्ष (८.३० कोटी) नोकऱ्या संपण्याची अपेक्षा आहे. अशाप्रकारे पाहिले तर सुमारे १४ दशलक्ष (१.४० कोटी) नोकऱ्या कमी होतील. हे सध्याच्या नोकऱ्यांच्या २ टक्के इतके आहे.

WEF Report 2023 : ‘या’ कारणांमुळे ‘रोजगार’ मार्केटमध्ये उलथापालथ

WEF ने प्रसिद्ध केलेल्या अहवालात पुढच्या पाच वर्षात किती नवीन नोकऱ्या निर्माण होतील, किती नोकऱ्या जातील ही माहिती दिली आहे. याबरोबरच पुढच्या काही वर्षात जॉब मार्केटमध्ये काय बदल होतील हे देखील स्पष्ट करण्यात आले आहे. यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI), मशीन लर्निंग आणि डेटा सेगमेंट यामुळे नोकरीच्या मार्केटमध्ये मोठी उलथापालथ होणार आहे. काही क्षेत्रांमध्ये नोकऱ्या वाढतील, तर अनेक क्षेत्रे आहेत जिथे नोकऱ्या कमी होतील, असे WEF च्या ‘फ्यूचर ऑफ जॉब्स‘ या अहवालातून स्पष्ट करण्यात आले आहे.

‘या’ क्षेत्रातील नोकऱ्या वाढणार

कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग (38 टक्के), डेटा विश्लेषक आणि शास्त्रज्ञ (33 टक्के), आणि डेटा एन्ट्री क्लर्क (32 टक्के) या क्षेत्रात २०२७ पर्यंत जागतिक रोजगार बाजारात नोकऱ्या निर्माण होतील, असे अपेक्षित आहे.

AI मुळे या क्षेत्रावर संकंट

याउलट आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात एआय चा वापर वाढल्याने काही क्षेत्रांमधील नोकऱ्या कमी होतील. यापैकी, लेखापाल आणि लेखा परीक्षक (5 टक्के), ऑपरेशन मॅनेजर (14 टक्के) आणि कारखाना कामगार (18 टक्के) या क्षेत्रातील AI मुळे सर्वाधिक नोकऱ्या गमवाव्या लागतील, असे देखील WEF च्या ‘फ्यूचर ऑफ जॉब्स’ या अहवालात सांगण्यात आले आहे.

हेही वाचा :

Back to top button