शिर्डी मतदारसंघ नेहमी विकासाच्या मागे उभा : खा.डॉ. सुजय विखे पा | पुढारी

शिर्डी मतदारसंघ नेहमी विकासाच्या मागे उभा : खा.डॉ. सुजय विखे पा

लोणी(नगर); पुढारी वृत्तसेवा : शिर्डी मतदारसंघ हा नेहमीच विकासाच्या मागे उभा असतो. शेजारी हे त्रास देत असले तरी तुमचा त्रास तुम्हालाच होणार आहे. हा मतदारसंघ नेहमीच मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पाठीशी उभा आहे. आजपर्यंत विविध पदाच्या माध्यमातून सर्वांना न्याय दिला असून आमच्या मतदार संघात मतभेद वाढविण्याचे काम करू नका, असा इशारा खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी देतानाच राहाता बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपा शिवसेना प्रणित जनसेवा मंडळाच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले.

राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचार बैठकीमध्ये खा. डॉ. सुजय विखे पाटील हे दाढ बुद्रुक येथे मतदारांशी संवाद साधताना बोलत होते. यावेळी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना प्रणित जनसेवा मंडळाचे सर्व उमेदवार डॉ. विखे पाटील कारखान्याचे संचालक अ‍ॅड. भानुदास तांबे, देवीचंद तांबे, पंचायत समितीच्या माजी सभापती नंदाताई तांबे, दाढच्या सरपंच पूनम तांबे, प्रल्हाद बनसोडे आदींसह दुर्गापूर, हसनापूर, चंद्रापूर, दाढ, हनमंतगाव, पाथरे येथील मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

खा. सुजय विखे म्हणाले, विरोधकांनी ही निवडणूक आपणांवर लादली आहे. या मतदारसंघात मतभेद निर्माण करण्याचे काम केले आहे. हा मतदारसंघ नेहमीच विखे पाटील परिवारासोबत राहिला आहे. राज्यात भाजप आणि शिवसेनेचे सरकार अतिशय चांगले काम करीत आहे.  महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या निर्णयामुळे सर्वसामान्य जनतेला न्याय मिळत आहे.

येणार्‍या काळात मतदारसंघातील गावामध्ये बैठका घेऊन गावाचा विकास आराखडा तयार केला जाणार आहे. निवडकीतून आपली एकता दाखवून द्या, जिल्ह्यात बाजार समितीच्या निवडणुकीत पक्षाला मोठे यश मिळणार आहे, असे सांगून किती ही डोक लावा, काहीच फरक पडणार नाही. पण आम्ही डोकं लावलं की काय होत हे निकालानतंर कळेल, असे सांगितले. प्रारंभी प्रवरा बँकेचे संचालक प्रमोद रहाणे यांनी उमेदवारांचा परिचय आणि मतदान प्रक्रिया समजून सांगितली.

काहींना विकासकामे रुचत नाहीत..

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नाविन्यपूर्ण काम राज्यात सुरू करून वेगळा आदर्श निर्माण केला आहे. त्यांचा जास्त त्रास सध्या शेजारी होत आहे, असे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता विरोधाकांना त्यांची जागा या निमित्ताने दाखून देण्याची ही संधी असल्याचे खा. सुजय विखे यांनी सांगितले.

Back to top button