पुणे : जीओ फायबरच्या नावाखाली एकाला पाच लाखांचा गंडा | पुढारी

पुणे : जीओ फायबरच्या नावाखाली एकाला पाच लाखांचा गंडा

पुणे; पुढारी वृत्तसेवा : जीओ फायबरचे कनेक्शन देण्याच्या नावाखाली पुण्यातील एका नागरिकास व्हॉटसअ‍ॅपद्वारे जिओ फायबर एपीके फाइल पाठवून सदर तक्रारदार याचे नेट बँकिंग युजर आयडीचा अ‍ॅक्सेस मिळवून ऑनलाईन पाच लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणी दत्तवाडी पोलिस स्टेशनच्या सायबर पथकाने हरियाणा राज्यातून एकाला बेड्या ठोकल्या आहेत.

दत्तवाडी पोलिस स्टेशन क्षेत्रामध्ये राहणार्‍या एका 60 वर्षीय व्यक्तीस जीओ फायबरचे कनेक्शन हे सवलतीच्या दरामध्ये देतो, असे आमिष दाखवून त्यासाठी ऑनलाईन फॉर्म भरण्याच्या नावाखाली तक्रारदाराच्या नेट बँकिंग अकाऊंटची माहिती मिळविणेकामी जिओ फायबर एपीके फाईल व्हॉटसअ‍ॅपवर पाठवून ती डाऊनलोड करावयास सांगितली.

सदरचे अप्लिकेशन डाऊनलोड झाल्यानंतर त्या अ‍ॅप्लिकेशनद्वारे तक्रारदार यांच्या नेट बँकिंग अकाउंटच्या युजर आयडी व पासवर्डचा गैरवापर करून नेट बँकिंगद्वारे त्यांच्या बँक अकाउंटमधून परस्पर पाच लाख 698 रुपये अज्ञात आरोपीने 20 एप्रिल रोजी काढून घेतले होते. तांत्रिक विश्लेषणाद्वारे फसवणुकीची रक्कम ज्या खात्यामध्ये वळती झाली तो खातेधारक हा मु.पो. चिका, ता. गुहला, जि. कैथल, राज्य हरियाणा येथील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांचे पाठक हरियाणा येथे जाऊन त्यांनी आरोपीचा शोध घेऊन त्यास अटक केली आहे. ही कामगिरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय महाजन, गुन्हे निरीक्षक विजय खोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर तपास पथकातील उपनिरीक्षक अक्षय सरवदे यांच्या पथकाने केली.

Back to top button